। लोकजागर । फलटण । दि. २५ नोव्हेंबर २०२५ ।
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने नागरिकांना मोठे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, “फलटण शहराला स्थिर ठेवण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी आणि शहराचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आपल्याला श्रीमंत अनिकेतराजे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही.” यासाठी पालिकेच्या निवडणुकीत श्रीमंत अनिकेतराजे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना चांगल्या मतांनी निवडून आणा, अशी विनंती त्यांनी केली.
शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील शिवसेनेचे उमेदवार विशाल तेली व सौ. सुवर्णा खानविलकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या मतदारांच्या बैठकीत श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी प्रभागातील नागरिक, तसेच अनेक आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
श्रीमंत संजीवराजे पुढे म्हणाले की, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात आपण ही पालिका निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालो आहोत. पालिकेचा कारभार सुरळीत चालावा यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केला आहे. मतदारांच्या मनात ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह रुजण्याची गरज आहे. त्यांनी यावेळी तिकीट न मिळालेल्या इच्छुकांनाही शांत राहण्याची विनंती केली. ते म्हणाले, “उमेदवार निवडताना काहींना थांबा म्हणावे लागते; ज्यांना थांबवलं आहे, तेही तुल्यबळच असतात, त्यामुळे त्यांनी आपली नाराजी दूर करावी.”
त्यांनी विश्वास व्यक्त केला की, आपल्या प्रभागातील सर्व इच्छुकांनी श्रीमंत रामराजेंवर विश्वास ठेवून आपण दिलेल्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. “समविचारी लोक सोबत असले की आपल्याला यश मिळते,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी लोकांना आठवण करून दिली की, “राजकीय परिस्थिती अस्थिर आहे, त्यामुळे फलटणसाठी योग्य माणसांची निवड करणे आवश्यक आहे.” नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे हे अत्यंत सुशिक्षित आहेत आणि ते ‘आपण आपल्या लोकांबरोबरच राहायचे’ या भूमिकेतूनच फलटणला आले आहेत. “आता फक्त फलटणचा विचार घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे,” हे लक्षात ठेवा, असे ते म्हणाले.
शहराची लोकसंख्या वाढली आहे, शहरात चांगल्या शिक्षणाच्या सोयी आहेत, मुबलक पाणीपुरवठा आहे. ‘सुसंस्कृत गाव’ ही फलटणची चांगली प्रतिमा आपल्याला जपायची आहे. यासाठी श्रीमंत अनिकेतराजे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन श्रीमंत संजीवराजे यांनी उपस्थितांना केले.
