। लोकजागर । काळज । वसीम इनामदार । दि. 10 डिसेंबर 2025 ।
पुणे – पंढरपूर महामार्गालगत वसलेले काळज, तडवळे, डोंबाळवाडी, मुरूम, घाडगेमळा, नांदल, सासवड या गावातील प्रवासी आणि विद्यार्थ्यांना गेल्या अनेक दिवसांपासून काळज येथे एसटी बस न थांबल्यामुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. यासाठी काळज गावचे माजी उपसरपंच सचिन गाढवे पाटील यांनी ग्रामपंचायतीमार्फत वेळोवेळी लेखी मागणी केली होती; मात्र फलटण आगाराकडून याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. प्रसारमाध्यमांमधूनही या प्रश्नाचा पाठपुरावा होत होता.
या पार्श्वभूमीवर पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांची भेट घेऊन समस्या मांडली. यावेळी दोन्ही जनप्रतिनिधींनी तात्काळ पुढाकार घेत फळटण आगारप्रमुखांना संपर्क करून फलटण डेपोच्या या मार्गावरील सर्व एसटी बसेस काळज येथे थांबवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. आगारप्रमुख राहुल वाघमोडे यांनी तत्पर प्रतिसाद देत निर्णय अंमलात आणला. बसचालक व वाहक यांना आवश्यक सूचना देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
या बैठकीला तडवळे गावचे चेअरमन सिराजभाई शेख, युवा नेते अमोल खराडे, माजी उपसरपंच सचिनकुमार गाढवे, लक्ष्मण शिंदे, नंदकुमार गाढवे, सतिश गाढवे, संजय गाढवे, भिमराव गाढवे, विकी कुंभार, तुषार पिसाळ, धर्मेंद्र भगत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
काळज व पंचक्रोशीतील नागरिकांचा दीर्घकालीन प्रश्न सुटल्यामुळे आनंद व्यक्त केला जात असून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील व आगारप्रमुख राहुल वाघमोडे यांचे ग्रामस्थांकडून मनापासून आभार मानण्यात आले. तसेच प्रसारमाध्यमांनी पाठपुरावा केल्याने समस्या सुटण्यास गती मिळाल्याबद्दलही नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.
दरम्यान लटण–स्वारगेट नॉन-स्टॉप एसटी बसेस काळज स्टॉपवर थांबणार नाहीत. इतर कोणतीही फलटण डेपोची बस थांबली नाही तर संबंधित जनप्रतिनिधींचे कार्यकर्ते किंवा फलटण आगाराशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.
