संवेदनशीलता हरवणे म्हणजे समाजाच्या र्‍हासाची सुरुवात – प्रा. मिलिंद जोशी

अमर शेंडे यांच्या ‘सह्याद्रीची सावली – सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण’ पुस्तकाचे प्रकाशन

। लोकजागर । पुणे । दि. 10 डिसेंबर 2025 ।

‘‘संवेदनशीलता बोथट होणे आणि अश्रू आटणे ही समाजाच्या र्‍हासपर्वाची सुरुवात असते. सध्याच्या राजकारणात त्याचा कडेलोट दिसत आहे. अशा वातावरणात सामान्य माणसांचे दुःख पाहून गहिवरून येणारे स्वर आणि डोळ्यात पाणी आणणारी यशवंतराव चव्हाण यांची संवेदनशीलता प्रकर्षाने आठवते’’, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.

येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त अमर शेंडे लिखित ‘सह्याद्रीची सावली – सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, महामंडळाच्या कार्यवाहक सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, म.सा.प. सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ व म.सा.प. फलटण शाखा कोषाध्यक्षा सौ. अलका बेडकिहाळ उपस्थित होते.

‘‘यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन प्रवासात सौ. वेणूताईंची भूमिका समर्थ सहजीवनाचा आदर्श उभा करणारी आहे’’, असे प्रा. जोशी यांनी नमूद करुन, ‘‘अमर शेंडे यांनी सौ. वेणूताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू या चरित्रग्रंथातून अतिशय भावनिक स्वरूपात उभे केले आहेत’’, असेही सांगितले.

ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी, ‘‘हे पुस्तक आकाराने लहान असले तरी यांचे साहित्यिक मूल्य अत्यंत मोठे आहे’’, असे मत व्यक्त केले.

‘‘वेणूताईंचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या व यशवंतराव यांच्या भावविश्‍वाचा गोडवा यात साकारला आहे’’, असे लेखक अमर शेंडे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिताराजे पवार यांनी केले, तर विनोद कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

Spread the love