। लोकजागर । फलटण । दि. 16 डिसेंबर 2025 ।
पंचायत समिती फलटण शिक्षण विभागामार्फत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल, कोळकी येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कमला निंबकर बालभवन शाळेच्या विद्यार्थिनींनी मोठे यश संपादन केले आहे. या प्रदर्शनातील विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थिनींनी माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. इयत्ता नववीच्या वैष्णवी फुलचंद तावरे, खुशी रा. दोशी आणि इयत्ता दहावीच्या श्रेया सुरेश यादव यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यांच्या उत्कृष्ट तयारीच्या आणि हुशारीने दिलेल्या उत्तरांच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना प्रशस्तीपत्रक, पारितोषिक आणि मानाची ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.
या विज्ञान प्रदर्शनात कमला निंबकर बालभवन शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘SMART IRRIGATION’ हे वैज्ञानिक उपकरणही सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. या उपकरणात इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक आणि यांत्रिक ऊर्जा यांचा सुरेख आणि प्रभावी संयोजनात्मक वापर करण्यात आला आहे. उपकरणातील सेन्सर (Sensor) मातीतील ओलावा आणि पाण्याचे प्रमाण अचूकपणे तपासतो, ज्यामुळे शेती किंवा बागेला आवश्यक तेवढेच पाणी मिळते. यामुळे पाण्याची तसेच विजेची मोठ्या प्रमाणावर बचत करणे शक्य होणार आहे. इयत्ता नववीचे रुद्र ढेंबरे आणि प्रियांका विक्रांत गांधी यांनी या प्रकल्पात सहभाग घेतला होता आणि त्यांना कॉम्प्युटर विभागाचे शिक्षक श्री. तेजस राऊत यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनींवर तसेच ‘SMART IRRIGATION’ उपकरण तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सध्या सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रश्नमंजुषेसाठी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट तयारी करून देणाऱ्या मार्गदर्शक शिक्षिका सौ. आसावरी राजेश शिंदे यांचेही विशेष कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थिनींना हे मोठे यश संपादन करता आले.
शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. गीता बोबडे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. प्रियदर्शिनी सावंत, शिक्षण समन्वयक मधुरा राजवंशी, विशेष सल्लागार व शिक्षक विश्वास जगदाळे, तसेच सर्व शिक्षकांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या या उत्तुंग कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले. हा केवळ शाळेसाठीच नव्हे, तर फलटण तालुक्यासाठी अभिमानास्पद क्षण ठरला आहे.
