| लोकजागर | फलटण | दिनांक २० डिसेंबर २०२५ |
फलटण शहर आज एका मोठ्या उत्सवासाठी सज्ज झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या असून, आज शहराच्या विकासाची चावी कुणाकडे द्यायची, याचा निर्णय ‘मतदार राजा’ घेणार आहे. फलटण नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी आणि १३ प्रभागांमधील २७ नगरसेवक पदांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
शहरात महिला मतदारांचा टक्का मोठा
फलटण शहरात एकूण ४५ हजार ५१४ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विशेष म्हणजे, यंदा पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त आहे. एकूण मतदारांमध्ये २२ हजार २९१ पुरुष, २३ हजार २१७ महिला आणि ६ इतर मतदारांचा समावेश आहे. या सर्व मतदारांच्या हातात आज उमेदवारांचं भविष्य बंदिस्त होणार आहे.
आजचा दिवस तुमच्या हक्काचा!
वर्षभर राजकारणी लोकांच्या घरी येतात, भाषणं ठोकतात आणि आश्वासनं देतात. पण आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने सामान्य फलटणकरांच्या हक्काचा दिवस आहे. तुमच्या एका मतामध्ये शहराचं भवितव्य बदलण्याची ताकद आहे. घराबाहेर पडा आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता, शहराच्या प्रगतीसाठी निर्भयपणे मतदान करा. आज तुमच्या बोटाला लागणारी शाई ही केवळ खूण नाही, तर तो तुमचा या लोकशाहीतला सर्वात मोठा अधिकार आहे.
प्रशासनाकडून चोख बंदोबस्त आणि जय्यत तयारी
मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने मोठी कसरत केली आहे. शहरात एकूण ४८ मतदान केंद्रं उभारण्यात आली असून, प्रत्येक केंद्रावर ७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशाप्रकारे संपूर्ण शहरात ५५० कर्मचारी या प्रक्रियेसाठी अहोरात्र राबत आहेत. प्रत्येक केंद्रावर ईव्हीएम मशिनची उपलब्धता करण्यात आली असून त्यामध्ये एक कंट्रोल युनिट आणि दोन बॅलेट युनिट देण्यात आले आहे. कुठेही गोंधळ होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनानेही कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
उद्या सकाळी दहा वाजता फैसला
आज मतदान पार पडल्यानंतर सर्वांचे डोळे उद्याच्या निकालाकडे असणार आहेत. उद्या म्हणजेच २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी बारा-एक वाजेपर्यंत फलटणचा नवा कारभारी कोण, हे चित्र स्पष्ट होईल. आजच्या मतदानानंतर शहरात कोणाचं पारडं जड राहणार, याचीच चर्चा आता गल्लीबोळात रंगू लागली आहे.
