। लोकजागर । सातारा । दि. २४ डिसेंबर २०२५ ।
“छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि शाहू महाराजांची सर्वधर्मसमभावाची परंपरा मोडीत काढणे हे प्रतिगामी शक्तींचे पहिले टार्गेट आहे. मात्र, ही परंपरा जपणे हे विद्रोही चळवळीसह आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य असून आपण ती प्राणापलीकडे जाऊन जपूया,” असे प्रखर विचार ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक निरंजन टकले यांनी साताऱ्यात मांडले. शेतकऱ्यांची दुःखे आणि स्त्रियांच्या प्रश्नांवर सत्याची बाजू घेऊन लिहिताना तथाकथित अभिजन साहित्यिक दिसत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी मुख्य प्रवाहातील साहित्यिकांवर तोफ डागली.
साताऱ्यात होणाऱ्या १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या पार्श्वभूमीवर दैवज्ञ सांस्कृतिक भवन येथे ‘घालमोडे दादांचे साहित्य संमेलन व आमची भूमिका’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर १४ व्या विद्रोही संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, पद्मश्री लक्ष्मण माने, कॉ. धनाजी गुरव, ॲड. सुभाष पाटील, डॉ. सुहास महाराज फडतरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विश्वास पाटील यांच्यावर बोचरी टीका
निरंजन टकले यांनी आपल्या भाषणात ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला. “विश्वास पाटील यांनी त्यांच्या लेखनातून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आहे. छत्रपतींच्या वारसांनी त्यांना जाब विचारण्याऐवजी तेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष झाले आहेत, हे दुर्दैवी आहे,” अशी टीका त्यांनी केली.
‘घालमोडे दादा’ आणि आजचे वास्तव
महात्मा फुले यांनी मराठी ग्रंथकार सभेला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत टकले म्हणाले की, “आजच्या साहित्यिकांकडून मानवी कल्याणाचे काहीही होणार नाही, हे फुले यांनी पूर्वीच ओळखले होते आणि त्यांना ‘घालमोड्या दादा’ म्हटले होते. ते पत्र आजही तंतोतंत लागू होते.” हजारो सरकारी शाळा बंद होत असताना आणि मराठी भाषेचा संकोच होत असताना साहित्यिक गप्प का? असा परखड सवालही त्यांनी उपस्थित केला. “जर मुले मराठी शिकलीच नाहीत, तर तुमची पुस्तके वाचणार कोण?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित कलावंतांना विचारला.
विद्रोहीचा निर्धार: प्रतिसरकार आणि लोकशाहीची मजबूती
अध्यक्षीय भाषणात डॉ. भारत पाटणकर यांनी विद्रोही परंपरा ही बुद्ध, चार्वाक, तुकाराम आणि फुलेंची असल्याचे सांगून तीच चळवळ पुढे नेण्याचे आवाहन केले. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव यांनी सातारचे आगामी विद्रोही संमेलन हे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ‘प्रतिसरकार’च्या संकल्पनेवर आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी आयोजित केल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी हात उंचावून आगामी विद्रोही साहित्य संमेलन निर्धाराने यशस्वी करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीगीतांनी झाली, तर सूत्रसंचालन मिनाज सय्यद यांनी आणि आभार प्रदर्शन विजय मांडके यांनी केले.
