महिला अत्याचार रोखण्यासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल होणे आवश्यक : अशोक भोसले; बरड येथे महिला सुरक्षा व जाणीव जागृती सोहळा उत्साहात संपन्न

। लोकजागर । बरड (फलटण) । दि. २४ डिसेंबर २०२५ ।

“महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी केवळ कायदे असून चालणार नाही, तर समाजाच्या मानसिकतेत मुळापासून बदल होणे अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन प्रमुख वक्ते अशोक भोसले यांनी केले. फलटण तालुक्यातील बरड (लोंढेवस्ती–झिरपवस्ती) येथे आयोजित महिला सुरक्षा व जाणीव जागृती कार्यक्रमात ते बोलत होते.

नवयान संशोधन उन्नती आणि शिक्षण-प्रशिक्षण संस्था (बरड) यांच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील महिला व युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.


कायद्याची ढाल आणि आर्थिक सक्षमतेचे बळ

कार्यक्रमात महिलांना त्यांच्या मूलभूत हक्कांची आणि संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांची सखोल माहिती देण्यात आली. अशोक भोसले यांनी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाविरोधातील तरतुदी स्पष्ट केल्या. “महिलांनी अन्यायाविरोधात मौन न पाळता ठामपणे उभे राहावे,” असे आवाहन त्यांनी केले.

स्त्री-पुरुष समानतेवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, कुटुंबात स्त्री आणि पुरुष हे दोन्ही घटक समान महत्त्वाचे आहेत. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचा उपयोग करावा आणि आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण द्यावे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.


सामाजिक संघटना काळाची गरज

याप्रसंगी अश्विनी अहिवळे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केवळ वैयक्तिक प्रयत्न पुरेसे नाहीत. यासाठी गावोगावी सर्व जाती-धर्मातील महिलांच्या मजबूत सामाजिक संघटना निर्माण होणे गरजेचे आहे. नवयान संस्थेने अशा संघटना उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष हनुमंत भानुदास लोंढे यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. सचिव राजश्री लोंढे यांनी उपस्थितांचे आभार मानले. घरातील सुसंस्कार आणि अपशब्दांचा त्याग हीच खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरेल, असा सूर या कार्यक्रमातून उमटला.

Spread the love