फलटणमधील प्रवृत्तीचा अंत झाला असून आता विकासाचे नवे पर्व सुरू; नामदार जयकुमार गोरे यांचे प्रतिपादन

​गजानन चौकात विजयी उमेदवारांचा जंगी सत्कार; भाजप-राष्ट्रवादी युतीचा शक्तीप्रदर्शनाने ‘आभार सोहळा’ संपन्न

​| लोकजागर | फलटण | दिनांक २५ डिसेंबर.२०२५ |

“गेल्या ३० वर्षांपासून फलटणच्या मातीचे नुकसान करणाऱ्या प्रवृत्तीचा अंत झाला असून, आता खऱ्या अर्थाने विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. फलटणकरांनी परिवर्तनाचा कौल देऊन एका षडयंत्रकारी नेतृत्वाला नाकारले आहे,” असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी केले. फलटण नगर परिषद निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर आयोजित आभार सभा आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

​शहरातील गजानन चौकात हा भव्य सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नवनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

​पुढील निवडणुकीत सत्ता द्या, २०० कोटींचा निधी देतो – जयकुमार गोरे

​आपल्या आक्रमक भाषणात नामदार गोरे पुढे म्हणाले की, “विरोधकांनी नेहमीच विकासाला खीळ घातली. पाणी, रेल्वे, एमआयडीसी आणि रुग्णालयांना विरोध करणारे नेतृत्व मी पहिल्यांदाच पाहिले. मात्र, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विकासाचा डोंगर उभा करून जनतेचा विश्वास जिंकला. आता फलटणकरांनी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही हीच ताकद दाखवावी, मी रस्त्यांसाठी २०० कोटींचा निधी आणण्याची जबाबदारी घेतो.” यावेळी त्यांनी निवडणुकीत राजकीय भूमिका घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनाही कडक इशारा दिला.

​३० वर्षांचे काम ६ महिन्यात करून दाखवू – रणजितसिंह नाईक निंबाळकर

​माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विरोधकांचा समाचार घेताना सांगितले की, “विरोधकांनी माझ्यावर कुभांड रचले, पण जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. आता पालिका अधिकाऱ्यांनी ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडून काम करावे. ३० वर्षांत जे झाले नाही, ते आम्हाला ६ महिन्यात करायचे आहे. शहराच्या विकासाची आणि नगराध्यक्षांनी दिलेल्या शब्दाची जबाबदारी माझी, आमदार सचिन पाटील आणि मंत्री जयकुमार गोरे यांची असेल.”

​६ महिन्यात फलटण खड्डेमुक्त करणार – नगराध्यक्ष समशेरसिंह

​नवनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी जनतेचे आभार मानताना सांगितले की, “आजवर पालिकेकडे उत्पन्नाचे साधन म्हणून पाहिले गेले, पण आता ही लोकांच्या मालकीची नगरपालिका असेल. येत्या ६ महिन्यात शहर खड्डेमुक्त करू आणि प्रलंबित पाण्याच्या टाक्या कार्यान्वित करू. फलटणला स्वच्छ आणि सुसज्ज करण्यासाठी मला सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे.”

​जुन्यांचा सन्मान आणि नव्यांचे स्वागत – ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर

​ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी अत्यंत भावूक आणि खंबीर भाषण केले. त्या म्हणाल्या, “ज्यांनी खोटे आरोप करून माझ्या पतीच्या डोळ्यात पाणी आणले, त्यांना मी कधीही माफ करणार नाही. आमचा कारखाना आम्ही हिमतीवर चालवतो, तो भाड्याने दिलेला नाही. येणाऱ्या काळात जुन्या कार्यकर्त्यांचा मान राखला जाईल आणि नव्यांचेही जोरदार स्वागत होईल. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जिंकण्याचा आमचा निर्धार आहे.”

​फलटण बारामतीच्या तोडीचे करू – आ. सचिन पाटील

​आमदार सचिन पाटील यांनी विश्वास व्यक्त केला की, “आम्ही ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढवली आहे. रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि पाणी या प्रश्नांना आमचे प्राधान्य असेल. समशेर दादांच्या नेतृत्वात फलटण शहर कमीत कमी वेळात बारामतीच्या तोडीचे विकसित केले जाईल.”

या सभेला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, प्रल्हादराव साळुंखे पाटील, सौ. प्रतिभा शिंदे, डी. के. पवार, ॲड. नरसिंह निकम, विश्वासराव भोसले, अनुप शहा, सनी काकडे, संतोष सावंत यांच्यासह हजारो कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मनोगत विविध मान्यवरांनी व्यक्त केले.

आभार रणजितसिंह भोसले यांनी मानले. सूत्रसंचालन आनंद पवार यांनी केले.

Spread the love