ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र बेडकीहाळ यांच्या अध्यक्षतेखाली उपक्रमाचे नियोजन
। लोकजागर । सातारा / पुणे । दि. २७ डिसेंबर २०२५ ।
साताऱ्यात होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त एक अत्यंत अभिनव आणि भावनिक उपक्रम राबवण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्याला लाभलेली साहित्यिकांची समृद्ध परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि दिवंगत साहित्यिकांच्या स्मृती जागवण्यासाठी गुरुवार, दि. १ जानेवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील विविध भागांतून ‘साहित्य प्रेरणा ज्योत’ काढली जाणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या इतिहासात हा अशा प्रकारचा पहिलाच आगळावेगळा उपक्रम ठरणार आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र बेडकीहाळ यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून निघणाऱ्या या ज्योती साताऱ्यातील शिवतीर्थावर एकत्र येतील आणि तिथून त्या मुख्य संमेलन स्थळाकडे (शाहू स्टेडियम) प्रस्थान करतील.
जिल्ह्यातील या प्रमुख स्थळांहून निघणार ‘प्रेरणा ज्योत’: या उपक्रमांतर्गत साताऱ्यातील नगर वाचनालयातून थोरले प्रतापसिंह महाराज आणि प्रतापसिंह हायस्कूलमधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ ज्योत निघेल. फलटणमधून बेबीताई कांबळे व प्राचार्य शिवाजीराव भोसले, मर्ढ्यातून बा. सी. मर्ढेकर, वाईतून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, तर नायगाव व कटगुण येथून अनुक्रमे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने प्रेरणा ज्योत मार्गस्थ होईल. याशिवाय कराडमधून यशवंतराव चव्हाण, गोपाळ गणेश आगरकर, इंदिरा संत; पाटणमधून कवी विहंग; रहिमतपूरमधून वसंत कानेटकर आणि एनकूळमधून उत्तम बंडू तुपे अशा दिग्गज साहित्यिकांच्या निवासस्थानांहून या ज्योती संमेलनस्थळी आणल्या जाणार आहेत.
१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता संमेलनस्थळी या सर्व साहित्य प्रेरणा ज्योतींचे स्वागत ९९व्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी असतील, तर स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या अभिनव उपक्रमामुळे संमेलनाच्या वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला असून, गावोगावी या ज्योतींचे स्वागत करण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत.
