। लोकजागर । सातारा (स्वराज्यरक्षक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी) । दि. ३ जानेवारी २०२६ ।
“महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ मराठी भाषाच सक्तीची राहील, अन्य कोणत्याही भाषेची सक्ती केली जाणार नाही,” अशा स्पष्ट आणि खंबीर शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मायमराठीच्या भवितव्याबद्दल ग्वाही दिली. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मराठी भाषेचा सन्मान, अभिजात दर्जा आणि साहित्य संस्थांची स्वायत्तता यांवर महत्त्वपूर्ण भाष्य केले.
भाषेच्या सक्तीवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
कार्यक्रमाच्या सुरुवातीला साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी अन्य भाषांच्या वाढत्या सक्तीवर चिंता व्यक्त केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, त्रिभाषा सूत्रानुसार कोणत्या वर्गापासून कोणती भाषा शिकवावी, यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून त्याचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. “मराठीला केंद्राने अभिजात दर्जा देऊन राजमान्यता दिली आहे, आता तिला लोकमान्यता मिळवून देण्याचे काम आपल्याला करायचे आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
स्वभाषेचा सन्मान आणि परकीय भाषांचा स्वीकार
इंग्रजी, फ्रेंच किंवा जर्मन यांसारख्या परदेशी भाषांचे आपण स्वागत करतो, मात्र भारतीय भाषांना विरोध करतो, ही वृत्ती योग्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. “स्वभाषेचा सन्मान करतानाच इतर भाषांचे स्वागत व्हायला हवे. मराठी ही केवळ भक्तीची भाषा नसून ती मूल्यांची आणि मनांना जोडणारी भाषा आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. वारकरी संप्रदाय आणि संतसाहित्यानेच खऱ्या अर्थाने मराठी साहित्याला समृद्ध केले आहे, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
साहित्य संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप होणार नाही
साहित्य विश्वात वाढत्या राजकीय हस्तक्षेपाबाबत व्यक्त होणाऱ्या चिंतेवर मुख्यमंत्र्यांनी साहित्यिकांना मोठी ग्वाही दिली. “साहित्य संस्थांच्या स्वायत्ततेमध्ये सरकार किंवा कोणताही राजकीय घटक हस्तक्षेप करणार नाही. साहित्यिकांनी राजकारणात जरूर यावे, पण साहित्य विश्वात राजकारण आणू नये,” अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. यामुळे उपस्थित साहित्यिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत केले.
व्यासपीठावरील मान्यवर
या सोहळ्याला संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रख्यात लेखिका डॉ. मृदुला गर्ग, मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उद्योजक फरोक कुपर, प्रा. डॉ. शिवाजीराव कदम आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासक भूमिकेमुळे ९९ व्या साहित्य संमेलनाचा पहिला दिवस मराठी अस्मितेच्या जागरणाने गाजला.
