। लोकजागर । फलटण । दि. ४ जानेवारी २०२६ ।
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी दिला जाणारा मानाचा ‘राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार’ वितरण सोहळा मंगळवार, ६ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटण या संस्थेच्या वतीने आणि पोंभुर्ले ग्रामपंचायत (जि.सिंधुदुर्ग), जांभेकर कुटुंबीय तसेच पोंभुर्ले व जांभे-देऊळवाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सोहळा देवगड तालुक्यातील पोंभुर्ले येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारक प्रकल्पातील ‘दर्पण सभागृह’ येथे सकाळी १०:३० वाजता संपन्न होईल. हा पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. प्रा. श्री. राम शिंदे, गोवा विधानसभेचे अध्यक्ष ना. श्री. गणेश गावकर, आणि महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना. श्री. नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे अध्यक्षपद महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ भूषवणार असून मुंबई दूरदर्शन केंद्राचे माजी सहाय्यक केंद्र संचालक जयेंद्र (जयु) भाटकर हे देखील या कार्यक्रमास विशेष उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकान्वये देण्यात आली.
या गौरव सोहळ्यात सन २०२५ च्या ‘दर्पण’ पुरस्कारांसाठी निवड झालेल्या राज्यभरातील विविध पत्रकारांचा सन्मान केला जाणार आहे. यामध्ये पुण्याचे ज्येष्ठ पत्रकार श्री. राजीव साबडे, नांदेडच्या दै. प्रजावाणीचे संपादक श्री. शंतनु डोईफोडे, मसूर (जि.सातारा) येथील ‘गुंफण’ दिवाळी अंकाचे संपादक श्री. बसवेश्वर चेणगे, सातार्यातील ज्येष्ठ पत्रकार श्री. जीवनधर चव्हाण, श्रीरामपूरच्या दै. स्नेहप्रकाशचे संपादक श्री. प्रकाश कुलथे, सिंधुदुर्गमधील दै. लोकमतचे श्री. विजय पालकर, अहिल्यानगरच्या दै. नगर टाइम्सचे कार्यकारी संपादक श्री. श्रीराम जोशी, यवतमाळमधील दै. सकाळचे श्री. अनिल काळबांडे, कोल्हापूर येथील मँगो एफ.एम. चे केंद्रप्रमुख श्री. आशिष कदम आणि पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी श्री. युवराज पाटील यांचा समावेश आहे.
या समारंभाच्यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रविंद्र बेडकिहाळ लिखीत व संपादित ‘‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर कर्तृत्त्वाचा एक शोध’ या त्रिखंडात्मक चरित्राचे लोकार्पण होणार आहे. मराठी वृत्तपत्रसृष्टीतील या महत्त्वाच्या कार्यक्रमास सर्व पत्रकार बांधवांनी आणि नागरिकांनी आपल्या सहकार्यांसह अगत्याने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या विश्वस्त मंडळाने आणि पोंभुर्ले ग्रामस्थांनी केले आहे.
