विद्यालयाचा ८० वा स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न; गुणवंत शिक्षक व शिपायांचा सन्मान
। लोकजागर । फलटण । दि. १३ जानेवारी २०२६ ।
“साखरवाडी विद्यालयाचे माजी विद्यार्थी आज राष्ट्रीय स्तरावर स्वतःचे नाव कमावून शासकीय सेवेत उच्च पदांवर कार्यरत आहेत. सध्याच्या विद्यार्थ्यांनी या यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कठोर परिश्रम करावेत आणि प्रशालेचा नावलौकिक अधिक उंचीवर न्यावा,” असे प्रतिपादन साखरवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धनंजय दादा साळुंखे पाटील यांनी केले. साखरवाडी विद्यालयातील सर्व विभागांचा ८० वा स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला, त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विश्वस्त समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे पाटील, संचालक राजेंद्र शेवाळे, माणिक अप्पा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी विद्यार्थ्यांची कृतज्ञता आणि मदतीचा ओघ
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि पुणे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. “मी आज ज्या पदावर आहे, त्याचे बीज या शाळेत पेरले गेले आहे,” असे सांगत त्यांनी शाळेला संगणक भेट दिला. दुसरे माजी विद्यार्थी आर्यन सूर्यवंशी यांनी आपल्या संघर्षाचा प्रवास मांडत, गरिबीवर मात करून शैक्षणिक संस्था उभी केल्याचे सांगितले. त्यांनी दहावी ते स्पर्धा परीक्षेपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली. तसेच, एका रुग्णावस्थेत असलेल्या विद्यार्थ्यास माजी विद्यार्थ्यांच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला, तर सुहास पटवर्धन यांनी संस्थेस १० हजार रुपयांची मदत केली.
‘प्रकाश’ संवास्तरिकेचे प्रकाशन व गुणवंतांचा गौरव
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. संस्थेच्या सचिव व मुख्याध्यापिका सौ. उर्मिला जगदाळे यांनी मान्यवरांचे स्वागत करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी शाळेच्या ‘प्रकाश’ या संवास्तरिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी आदर्श गुणवंत शिक्षक म्हणून सुनील भोसले, सौ. अर्चना तावरे, गोपाळ कांबळे, कमलाकर गांगुर्डे, वनिता भागीत, वैशाली अडसूळ यांचा सन्मान करण्यात आला, तर आमीन शेख यांना आदर्श शिपाई म्हणून गौरविण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
दुपारच्या सत्रात सुमारे ५०० विद्यार्थिनींनी विविध करमणुकीच्या कार्यक्रमांत सहभाग घेऊन प्रेक्षकांची मने जिंकली. या सोहळ्याला माजी मुख्याध्यापक प्रल्हाद बोंद्रे, संपत सांगण, संदीप चांगण, मोहन सरगर, हरिदास सावंत यांच्यासह पुण्यातील सुरेश हब्बू, अरविंद किंकर व मोठ्या संख्येने पालक व माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन शिंदे यांनी केले तर आभार संदीप वाघमोड यांनी मानले.
