। लोकजागर । फलटण । दि. १३ जानेवारी २०२६ ।
श्रीराम-जवाहर सहकारी साखर कारखान्याने खडकहिरा ओढ्यात आणि सार्वजनिक रस्त्यावर केलेले अतिक्रमण येत्या १० दिवसांत न काढल्यास, २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी पोपटराव बर्गे यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी फलटणच्या तहसीलदारांना अधिकृत निवेदन सादर केले असून, कारखान्याच्या मनमानी कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नैसर्गिक चारीची दिशा बदलल्याने शेती व आरोग्याचा प्रश्न गंभीर
बर्गे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, खडकहिरा ओढ्याशेजारील रहिवासी आणि शेतकऱ्यांचा येण्या-जाण्याचा सार्वजनिक रस्ता कारखान्याने खडी, मुरूम आणि माती टाकून अडवला आहे. एवढेच नव्हे तर, कारखान्याने ओढ्यात मोठ्या प्रमाणात बाहेरून गौण खनिज आणून टाकले असून तिथे अनधिकृत वाहनतळ निर्माण केले आहे. यामुळे ओढ्याची नैसर्गिक दिशा बदलली असून पाण्याचा प्रवाह आता थेट शेतकऱ्यांच्या शेताकडे आणि निवासाकडे वळवण्यात आला आहे. या ओढ्यातून कारखान्याचे सांडपाणी आणि मैलापाणी वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
प्रशासनाच्या ‘ढोळेझाक’ वृत्तीवर बर्गे यांचा प्रहार
या गंभीर प्रश्नाबाबत पोपटराव बर्गे हे गेल्या एक वर्षापासून तहसील कार्यालय, प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि पाटबंधारे विभागाकडे सतत पाठपुरावा करत आहेत. मात्र, वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासकीय अधिकारी या अतिक्रमणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बर्गे यांनी केला आहे. प्रशासनाच्या या निष्क्रीयतेमुळेच आता टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
२६ जानेवारीला तहसील कार्यालयासमोर आंदोलनाचा पवित्रा
येत्या आठ ते दहा दिवसांत खडकहिरा ओढ्यातील आणि रस्त्यावरील अतिक्रमण न काढल्यास २६ जानेवारीला तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे बर्गे यांनी स्पष्ट केले आहे. या दरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला संबंधित सर्व अधिकारी पूर्णपणे जबाबदार राहतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या निवेदनामुळे महसूल आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, कारखाना प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
