फलटणच्या मायणे कुटुंबाची लष्करी परंपरा कायम; यश विजय मायणे यांची ’अग्निवीर’ म्हणून भारतीय सैन्य दलात निवड

। लोकजागर । फलटण । दि. 13 जानेवारी 2026 ।

फलटण तालुका शिवसेना संघटक प्रमुख विजय बाळासाहेब मायणे यांचे चिरंजीव यश विजय मायणे यांनी भारतीय सैन्य दलात ‘अग्निवीर’ म्हणून निवड सार्थ ठरवत आपल्या कुटुंबाचा आणि तालुक्याचा गौरव वाढवला आहे. यश यांच्या या यशाने मायणे कुटुंबाच्या तिसर्‍या पिढीने देशसेवेचा वारसा यशस्वीपणे पुढे नेला आहे.

कुटुंबाचा लष्करी वारसा आणि जिद्द यश मायणे यांना सैन्य दलात जाण्याची प्रेरणा घरातूनच मिळाली. त्यांचे आजोबा बाळासाहेब जगन्नाथ मायणे आणि पणजोबा जगन्नाथ मायणे यांनी देखील भारतीय सैन्य दलात सेवा बजावली आहे. पूर्वजांच्या या पराक्रमाच्या कथा ऐकत लहानाचे मोठे झालेल्या यश यांनी बालपणापासूनच सैन्यात भरती होण्याचे ध्येय उराशी बाळगले होते. हे लक्ष्य गाठण्यासाठी त्यांनी शारीरिक चाचणीचा कठोर सराव केला आणि पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले.

यश यांच्या निवडीमुळे त्यांचे आई-वडील आणि संपूर्ण मायणे कुटुंबासाठी हा अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला आहे. त्यांच्या या यशाबद्दल राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक अशा सर्वच स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Spread the love