जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाला सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री शंभूराज देसाई
। लोकजागर । सातारा ।
सातारा जिल्ह्याला फार मोठी गौरवी परंपरा आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय घेऊन शासन आणि प्रशासन अहोरात्र झटत आहे. अनेक विकासाभिमूख योजना, उपक्रम प्रामाणिकपणे राबविण्यात येत आहेत. सातारा जिल्हा नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहे. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा यांच्या गुणवत्ता वृद्धीवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर पालकमंत्र्यांनी पोलीस दलाची मानवंदना स्विकारुन उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदीती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जलसंपदा विभागाचे अरूण नाईक, जयंत शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक जंयत करपे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, कोयना धरण ही महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रही भुमिका घेतली. त्यांच्या निर्देशानुसार आम्ही कोयना जलपर्यटननाचा आराखडा तयार केला आहे.त्याला मजुंरी मिळाली. पहिल्या टप्प्यात मुनावळे येथे वॉटर स्पोर्ट्सचे काम सुरु करण्यात आले आहे. जागतिक दर्जाचे स्कुबा ड्रायव्हिंग, वॉटरस्पोर्टस, जंगल ट्रेकिंग , जंगल सफारीची मुनावळे ते कोयना धरणाच्या भिंतीपासुन सात कि.मी ची मर्यादा पाळून कामे सुरु करण्यात आली आहेत.
सातारा जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. शहरातील खाजगी शाळांच्या दर्जाप्रमाणे ग्रामिण, डोंगरी–दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी मॉडेल स्कुल म्हणजेच माझी शाळा – आदर्श शाळा ही संकल्पना राबविण्यात आली आहे. त्यासाठी २२३ शाळा निवडण्यात आल्या आहेत. अनेक शाळांचे कामही सुरू आहे.
सर्वसामान्य जनतेला मल्टीस्पेशालिटी प्रमाणे दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्मार्ट प्रथमिक आरोग्य केंद्र ही संकल्पना आपण राबवित आहोत. पहिल्या टप्प्यात या उपक्रमात ९० टक्के पीएचसींचा सामावेश करण्यात आला आहे.सातारा जिल्हा हा वेगवेगळ्या, वैशिष्टयपुर्ण विकासकामांचे राज्यासाठी मॉडेल असला पाहिजे हा प्रयत्न सातत्याने सुरू आहे, असे सांगून पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, यापुढे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे या दिवशी राष्ट्रीय ध्वाजारोहणाच्या कार्यक्रमापुर्वी शहिद जवानांच्या स्मारकाला
(वॉर मेमोरियला) अभिवादन करण्याची प्रथा आपण सुरु केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी योजना शासनाने तयार केली आहे. प्रत्येक बहिणीला दरमहा १५०० रु. देण्याचा निर्णय शासणाने घेतला आहे. या योजनेचा पहिला टप्पा जमा होण्यास सुरुवातही झाली आहे. शासन महाराष्ट्राच्या विकासासाठी वचनबध्द, कटिबध्द आहे.
जिल्ह्याच्या विकास कामांसाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन क्रियाशील, प्रयत्नशिल आहे. त्यासाठी सर्व जिल्हावासियांचे माध्यम प्रतिनिधींचे सहकार्य आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि वॅार मेमोरियलला अभिवादनाची प्रथा सुरू
मुख्य शासकीय ध्वाजारोहणापुर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवई नाका येथील पुतळा आणि वॉर मेमोरियला अभिवादन करण्याची प्रथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आजपासुन सुरु केली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर वॉर मेमोरियल येथे पुष्पचक्र अर्पण करुन त्यांनी शहीद जवानांना अभिवादन केले. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विविध स्टॉल्सना त्यांनी भेटी दिल्या.
पालकमंत्री देसाई यांच्याहस्ते विविध पुरस्कार देण्यात आले.
वीरपत्नी श्रीमती प्रणाली वैभव भोईटे , वीरमाता व वीरपिता रा. राजाळे ता. फलटण यानां वैभव भोईटे हे कर्त्यव्य बजावत असताना शहीद झाल्यामुळे ताम्रपट देऊन सन्मानित करण्यात आले. नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना परिणामकारकरित्या आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलिस अधिकारी व अंमलदार यांना विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले. पोलिस अधीक्षक समीर शेख व इतर १६ पोलिस उपनिरीक्षक तसेच श्री. दिपक सदाशिव गिरीगोसावी पेालिस पाटील अनवडी, ता. वाई.यानां राज्यपाल यांच्यावतीने गौरवण्यात आले. सातारा जिल्हा कारगृह विभागामध्ये प्रशंसनिय कामगिरीबाबत शामकांत चंद्रकांत शेडगे यांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील पहिले जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयास आय.एस.ओ मांनाकन मिळाल्याबद्दल भाग्यश्री फरांदे जिल्हा कृषिअधीक्षक, सातारा व त्यांच्या सहकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी ते ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ताधारक विदयार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. सातारा जिल्ह्यात १४ वर्षात १२०५ अपघात मोहिमा तसेच ११० जीव वाचविणाऱ्या शिवेंद्रराजे रेस्क्यू टिमला विशेष गौरविण्यात आले. महाबळेश्वर ट्रेकर्स, महाबळेश्वर, सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वर, शिरवळ रेस्क्यू टिम शिरवळ, खंडाळा रेस्क्यू टिम खंडाळा, जिल्हा समादेशक होमगार्ड विभाग सातारा, इन्सपेक्टर (एन डि आर एफ) पुणे (कराड येथे पुर्वस्थित टिम) यानां पालकमत्र्यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
महसुल दिनानिमित्त उत्कृष्ठ अधिकारी , कर्मचारी यांना प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी १०८ या आपत्कालीन सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेबद्दल माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.