वार्षिक स्नेहसंमेलने कला आणि आत्मविश्‍वास दृढ होण्यास उपयुक्त : प्रमोद निंबाळकर

महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या शाखांचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

आदर्श विद्यार्थी आदित्य पवार यास पुरस्कार प्रदान करताना प्रमोद निंबाळकर. समवेत रविंद्र बेडकिहाळ, रविंद्र बर्गे, महादेव गुंजवटे, सौ. अलका बेडकिहाळ, मनीष निंबाळकर आणि इतर.

| लोकजागर | फलटण | दि. ०२ फेब्रुवारी २०२५ |

‘‘विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा विश्‍वास यांची जोड मिळाल्यास मुलांमध्ये आत्मविश्‍वास वाढतो.अशी वार्षिक स्नेहसंमेलने कला आणि आत्मविश्‍वास अधिक दृढ होण्यास उपयुक्त ठरतात’’, असे मत बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटरचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांनी व्यक्त केले.

महात्मा एज्युकेशन सोसायटीचे श्रीराम विद्याभवन, चतुराबाई शिंदे बालक मंदिर आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाचे उद्घाटन प्रमोद निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक विजयमाला गाजरे, पोलीस कॉन्स्टेबल राणी फाळके, संस्थेचे सचिव रविंद्र बेडकिहाळ यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सदस्य बापूसाहेब मोदी, श्रीराम विद्याभवन शाळा समितीचे चेअरमन रविंद्र बर्गे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय शाळा समितीच्या चेअरमन सौ.अलका बेडकिहाळ, मसापचे महादेव गुंजवटे, विकास शहा, पालक प्रतिनिधी सारीका वाघ, मुख्याध्यापक मनीष निंबाळकर (प्राथमिक), भिवा जगताप (माध्यमिक), सुरेखा सोनवले (बालक मंदिर) यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘‘संस्थेच्या तिन्ही शाखा उत्तम काम करत असून वार्षिक स्नेहसंमेलना सारखे विविध उपक्रम राबवून तिन्ही शाखांनी शहरात नावलौकिक वाढवला असल्याचे’’, गौरवोद्गार रविंद्र बेडकिहाळ यांनी यावेळी काढले.

दरम्यान, महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या तिन्ही शाखांचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट नृत्यकौशल्य आणि आत्मविश्‍वास पूर्वक सादरीकरण पाहून मान्यवरांसह पालकांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत होता. मुलांच्या कलेला दाद देण्यासाठी पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले. मुलींच्या ईशस्तवनाने संमेलनाची सुरूवात झाली.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बालगीते, कोळी नृत्य, आदिवासी नृत्य, कॉमेडी साँग, देशभक्तिपर गीते, जोगवा गीत, महाराष्ट्रीय नृत्य, छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा आदी गीतांवर सामूहिक नृत्य सादर करून पालकांची मने जिंकली.

दरम्यान कला, विज्ञान आणि रांगोळी प्रदर्शनात यश मिळवणार्‍या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. बेस्ट कँडीडेट ऑफ द इअर म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस पुरस्कार आदित्य दिपक पवार (प्राथमिक), रुपेश विशाल खुडे (माध्यमिक) आणि राणी लक्ष्मीबाई पुरस्कार सृष्टी बाबा इंगळे (प्राथमिक), अनुष्का अशोक पवार यांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

मनीष निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. भिवा जगताप यांनी आभार मानले. हेमलता गुंजवटे आणि निकिता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

Spread the love