रहिमतपूर येथे प्रा. वसंत कानेटकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले. सोबत आ. मनोज घोरपडे, डॉ. राजेंद्र शेंडे, प्रा. अरुण कानेटकर, अंजली कानेटकर, सुनिताराजे पवार, विनोद कुलकर्णी, रविंद्र बेडकिहाळ, शिरीष चिटणीस आदी.
ना.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले; रहिमतपूर येथे पुतळ्याचे अनावरण
। लोकजागर । सातारा । दि. 0५ फेब्रुवारी २०२५ ।
रहिमतपूरनगरीने अनेक मोठी व्यक्तिमत्त्वे महाराष्ट्राला दिली. प्रा. वसंत कानेटकर यांचा अर्ध पुतळा पाहून पुढच्या पिढीला त्यांच्या कार्याची कायम आठवण राहील. त्यांच्या स्मारकासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल’’, असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.
रहिमतपूर येथील चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटी, कै. उमाताई शंकर कानेटकर सार्वजनिक वाचनालय व महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा शाहुपुरी (सातारा) व रहिमतपूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने कवी गिरीश शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र, रहिमतपूर या ठिकाणी दिवंगत प्रा. वसंत कानेटकर यांचा अर्धपुतळा अनावरण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार मनोज घोरपडे होते. यावेळी आंतरराष्ट्रीय पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे, प्रा. अरुण कानेटकर, अंजली कानेटकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, मसाप पुणे प्रतिनिधी शिरीष चिटणीस, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ, माजी नगराध्यक्ष संपतराव माने, वासुदेव माने, सचिन बेलागडे, आशा भोसले, अरुण माने उपस्थित होते.
ना.श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले पुढे म्हणाले, ‘‘सांस्कृतिक, नाट्य आदी क्षेत्रांशी प्रा. वसंत कानेटकर यांचा संबंध आला होता. पुस्तकांच्या प्रतिकृतीवर पुतळा उभारण्याची अनोखी संकल्पना याठिकाणी राबवण्यात आलेली आहे. यातून कानेटकरांच्या कार्याची ओळख कायमस्वरुपी ठेवण्याच काम झाले आहे.’’
आमदार मनोज घोरपडे यांनी , ‘‘रहिमतपूर नगरीला चांगल्या कार्याचा वारसा लाभला असल्याचे सांगून’’, संस्था व कवी गिरीश सांस्कृतिक केंद्राचा भविष्यातील संकल्प पूर्ण करण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले.
सुनिताराजे पवार म्हणाल्या, ‘‘रहिमतपूरला अलौकिक वैशिष्ठ्य आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद ही आपल्या सर्वांच्या अस्मितेची गोष्ट आहे. परिषदेच्या शाहुपुरी आणि रहिमतपूर शाखेच्या विद्यमाने येथे उभारण्यात आलेले कानेटकरांचे स्मारक अभिनंदनीय आहे.’’
विनोद कुलकर्णी यांनी, ‘‘कानेटकर कुटूंबियांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी उभारण्यात आलेल्या पुतळा सर्वांना दिशादर्शक व प्रेरणादायी ठरणार आहे’’, असे सांगून ‘‘आगामी 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे व्हावे यासाठी सुनिताराजे पवार यांनी सहकार्य करावे’’, असे आवाहनही विनोद कुलकर्णी यांनी केले.
रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, ‘‘रहिमतपूरला कवी गिरीश आणि प्रा. वसंत कानेटकर यांच्या रुपाने साहित्यिक महत्त्व आहे. त्यामुळे शासनाने रहिमतपूर हे गाव ‘कवितेचे गाव’ म्हणून घोषीत करावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण माने यांनी केले. विकास पवार, अर्चना नाईक यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार सावंत यांनी आभार मानले.