श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील निवासस्थानाबाहेर जमलेली गर्दी.
। लोकजागर । फलटण । रोहित वाकडे | दि. 0६ फेब्रुवारी २०२५ ।
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या ‘बंगल्या’वर तपासयंत्रणेची धाड पडून तब्बल २४ तास उलटले असून अनपेक्षितरित्या पडलेल्या या धाडीमुळे फलटण शहरासह तालुक्यात कमालीची अस्वस्थता पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही हा तपास सुरू राहू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
प्रश्न सार्वजनिक स्वरुपाचा असो वा वैयक्तीक; तो सोडवण्यासाठी श्रीमंत संजीवराजे यांचा ‘सरोज व्हिला’ हा ‘बंगला’ सुप्रसिद्ध आहे. या ‘बंगल्या’वर आपापले प्रश्न घेवून सकाळपासून रात्रीपर्यंत तालुक्यातील अनेकजण दररोज येत असतात. मात्र काल सकाळपासून या ‘बंगल्या’चा ताबा तपासयंत्रणेनी घेतल्याने फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तपासयंत्रणांकडून माध्यमांना तपासाबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी श्रीमंत संजीवराजे यांच्या ‘गोविंद मिल्क’ या कंपनीच्या अनुषंगाने प्राप्तीकर विभागाचा हा तपासाचा फेरा सुरु असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, श्रीमंत संजीवराजे यांच्यावर ही चौकशीची धाड पडल्यापासून फलटण शहर व तालुक्यातून अस्वस्थ भावना व्यक्त होताना दिसत असून विशेषत: सोशल मिडीयावर याचे पडसाद उमटतं आहेत. काल सकाळी याबाबतची बातमी सर्वत्र पसरल्यापासून अनेक जण आचंबित होवून हा प्रकार योग्य नसल्याच्या भावना व्यक्त करत आहेत. राजे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी या प्रकाराला राजकीय किनार असल्याची शक्यता बोलून दाखवत आहेत; तर अशीच धाड जवळच्या इंदापूर तालुक्यातही पडली असल्याने काहीजण याचा संबंध व्यावसायिक स्पर्धेशी असल्याची शक्यता वर्तवत आहेत.
श्रीमंत संजीवराजे यांच्या बंगल्याबाहेर काल सकाळपासून रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली होती. तपास आजही सुरू राहिल्यास आजही तसेच चित्र पहायला मिळू शकते. त्यामुळे तपासाची कारवाई नक्की कधी संपणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
नेत्यांची संयमी भूमिका
दरम्यान, या प्रकारानंतर राजे गटाच्या नेत्यांनी संयमी भूमिका घेत तपासयंत्रणेला सहकार्य करण्याची भूमिका दर्शवली. आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ‘कृपया गर्दी करु नका, खात्याला काम करु द्या, काळजी नसावी’ असे आवाहन कार्यकर्त्यांना उद्देशून केले. तर माजी आमदार दीपक चव्हाण यांनी, “या कारवाईमुळे तालुक्यातील जनतेला वाईट वाटेल”, अशी भावना व्यक्त केली. फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी , “हे घर घेणारे नाही तर देणारे आहे”, असे सांगितले.
धाडीचा परिणाम राजकारणावर?
महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व राजे गटाने आत्ताच्या ‘लोकसभा’ व ‘विधानसभा’ निवडणूकीत घेतलेल्या भूमिकांमुळे राजकारणाच्या पटलावर फलटण चांगलेच गाजले होते. विधानसभा निवडणूकीत राजे गटाला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीपूर्वी राजे गटाचे नेतृत्त्व कोणती राजकीय खेळी खेळणार? याबाबत विविध तर्कवितर्क सुरु आहेत. श्रीमंत संजीवराजेंच्या ना. अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीत परत येण्याच्या चर्चाही गत काही दिवसांपासून राजकीय वर्तृळात सुरु आहेत. तपासयंत्रणेची धाड व्यवसायासंबंधी असल्याचे मानले जात असले तरी श्रीमंत संजीवराजे यांना तालुक्यात भले मोठे राजकीय वलय आहे. त्यामुळे या धाडीचा परिणाम राजे गटाच्या राजकारणावर कसा असेल?, या धाडी विरोधात राजे गट आक्रमक पवित्र्यात उतरेल की संयमी भूमिका कायम ठेवेल? याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.