फलटणला साकारणार भव्य ‘महसूल भवन’

दहा कोटीचा निधी मंजूर तर भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रासाठी साडे चार कोटी मंजूर : रणजितसिंह नाईक निंबाळकर

। लोकजागर । फलटण । दि. ०९ फेब्रुवारी २०२५ ।

फलटण शहरातील जुने रेव्हेन्यू क्लब पाडून त्याठिकाणी नवीन ‘महसूल भवन’ उभारणीसाठी दहा कोटी रुपये तर तालुक्यातील सावंतवाडी (उपळवे) येथे पोलीस / सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रासाठी साडे चार कोटी रुपयेचा भरघोस निधी राज्यशासनाकडून मंजूर झाला असल्याची माहिती माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

कोळकी (ता.फलटण) येथील इरिगेशन बंगल्यावर (दि. ८ रोजी) आयोजित पत्रकार परिषदेत रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील उपस्थित होते.

रणजितसिंह नाईक निंबाळकर पुढे म्हणाले, ‘‘सचिन पाटील आमदार झाल्यानंतर त्यांच्या विकासकामांची सुरुवात या नियोजित ‘महसूल भवन’ पासून झाली आहे. गेल्या महिन्यात आपण फलटणच्या रेव्हेन्यू क्लबची पाहणी करुन या ठिकाणी नवीन इमारतीसाठी निधीची मागणी शासनाकडे आमदारांच्या मार्फत केली होती. त्यानुसार आता या जुन्या रेव्हेन्यू क्लबची इमारत पाडून अद्ययावत रेव्हेन्यू क्लबची इमारत उभारण्यासाठी 10 कोटी रुपयांची मंजूरी राज्य सरकारने दिली आहे,’’ असे सांगून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, ना. एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले.

नियोजित प्रशिक्षण केंद्राबाबत माहिती देताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, ‘‘शासनाकडून सावंतवाडी (उपळवे) गावात सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रासाठी साडे चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. भविष्यात या कामासाठी आणखी चार ते पाच कोटीचा निधी उपबल्ध होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांसाठी निवासी संकुल, जलतरण तलाव, ट्रॅक, धर्नुविद्या, रायफल शुटींग सारख्या प्रशिक्षणासाठी निष्णात प्रशिक्षक उपलब्ध होणार आहेत’’, असे सांगून या मंजूर कामाबद्दल राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी धन्यवाद दिले.

भविष्यातील विकासाचा वाचला पाढा

पत्रकार परिषदे दरम्यान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तालुक्यात होऊ घातलेल्या विकासकामांबाबत माहिती देताना सांगितले की, ‘‘फलटण केंद्रबिंदूमानून इथून जाणार्‍या सर्व दिशांचे रस्ते लवकरच चारपदरी होणार आहेत. फलटण – दहिवडी – मायणी रस्त्याच्या कामाला निधी मंजूर झालेला आहे. शहरातील पालखी मार्गाची कामे सुरु झाली आहेत. रेल्वे प्रकल्याचे 50% काम झाले असून दोन वर्षात ही कामे पूर्ण होणार आहेत. नाईकबोमवाडी येथे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शहरासाठी नवीन सांस्कृतिक भवन मंजूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. झिरपवाडी रुग्णालयासाठी प्रयत्न सुरु आहेत. सिंचनभवनाला मान्यता मिळेल. उपजिल्हाधिकारी कार्यालय फलटण येथे सुरु होणार आहे. साखरवाडीला तहसिलदार कार्यालय सुरु होणार आहे’’, अशा शब्दात तालुक्यात होऊ घातलेल्या विकासकामांचा पाढा वाचून, ‘‘ फलटण तालुक्याचा चेहरा – मोहरा बदलण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे’’, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Spread the love