प्रशिक्षणासह रोजगार संधी : सातारा पोलीस दलाकडून युवकांसाठी ‘उंच भरारी योजना’

फलटण तालुक्यातील युवक व युवतींनी फलटण शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन

। लोकजागर । फलटण । दि. ०९ फेब्रुवारी २०२५ ।

सातारा जिल्हा पोलीस दल आणि प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेमार्फत १८ ते ३० वयोगटातील युवक व युवतींसाठी ‘उंच भरारी योजना’ राबवण्यात येणार असून या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतल्यास नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. तरी फलटण तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. १२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत फलटण शहर पोलीस ठाण्यात विहीत कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन फलटण शहर पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे.

काय आहे प्रशिक्षण ?

फलटण शहर पोलीस ठाण्याकडून जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार सदर योजनेअंतर्गत प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, भोर (जि.पुणे) येथे दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ पासून ४५ असिस्टंट इलेक्ट्रीकल (हाऊसहोल्ड वायरिंग, सोलर) चे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण ४५ दिवस चालणार आहे.

तसेच प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, लोहगाव (जि. पुणे) येथे दि. १४ फेब्रुवारी २०२५ पासून ४५ दिवसांचे टू व्हिलर सर्व्हिस टेक्नीशियनचे स्वतंत्र व फोर व्हिलर सर्व्हिस टेक्नीशियनचे स्वतंत्र प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

सदरचे प्रशिक्षण मोफत असून प्रशिक्षणाच्या ठिकाणी राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण स्थळी दि. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता सातारा तालुका पोलीस ठाणे, राधिका रोड, सातारा येथून पाठवण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर नामांकित कंपनीमध्ये नोकरी करण्याची हमखास संधी मिळणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांची वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे असून या वयोगटातील युवकांनी त्यांचे आधार कार्ड, इयत्ता १० वी पास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला, चार आयकार्ड साईज फोटो अशा कागदपत्रांच्या तीन झेरॉक्स प्रतींसह फलटण शहर पोलीस ठाण्यात दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या १० वाजण्यापूर्वी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी हेमंतकुमार शहा (पोलीस निरीक्षक) 7757827744 अथवा महेश जगदाळे (पोलीस शिपाई) 9730222902 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love