विकास व्यवहारे फलटणचे नूतन प्रांताधिकारी

नूतन प्रांताधिकारी विकास व्यवहारे यांचे स्वागत करताना निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, नायब तहसीलदार तुषार देशमुख.

। लोकजागर । फलटण । दि. ११ फेब्रुवारी २०२५ ।

फलटण उपविभागीय तथा प्रांताधिकारी पदी परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी विकास व्यवहारे यांची नियुक्त झाली असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे.

मूळचे इंदापूर तालुक्यातील असणारे विकास व्यवहारे हे २०२३ सालच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उपजिल्हाधिकारी (गट ‘अ’) पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत.

विकास व्यवहारे यांनी यापूर्वी माळशिरस येथे अप्पर तहसीलदार म्हणून काम केले आहे. फलटणचे यापूर्वीचे प्रांताधिकारी सचिन ढोले हे त्यांच्या सकारात्मक शैलीमुळे लोकप्रिय ठरले होते. आता त्यांच्या जागी रुजू झालेले नव्या दमाचे विकास व्यवहारे आपल्या कार्याची छाप कशी उमटवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान, विकास व्यवहारे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर महसूल प्रशासनाच्यावतीने निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, नायब तहसीलदार तुषार देशमुख यांनी त्यांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.

Spread the love