। लोकजागर । फलटण । दि. १२ फेब्रुवारी २०२५ ।
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि स्वातंत्र्य चळवळीतील नेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या पत्नी स्वर्गीय सौ. वेणूताई चव्हाण यांच्या जिंती नाका, फलटण येथील स्मारकाची दुरावस्था झालेली असून प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
पुण्याकडून फलटण शहरात प्रवेश करतानाच प्रवाश्यांना यशवंतराव आणि वेणूताई चव्हाण यांचा पुर्णाकृती पुतळा असणारे स्मारक दिसते. महाराष्ट्राचा केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा ह्या दाम्पत्याच्या कार्य-कर्तृत्वाने उजळला आहे, इतके त्यांचे कार्य मोठे आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्राची झालेली अवनती अशा स्मारकांच्या दुर्दशेतून ठळकपणे दिसून येत असते. लोकसेवेच्या नावाखाली इतर उद्योगधंदे करणार्यांना प्रतिष्ठा मिळत असलेल्या काळात येणार्या पिढ्यांसाठी प्रेरक ठरणारी स्मारके, पुतळे तरी आपण सुस्थितीत राखली पाहिजेत. अशी भावना या ठिकाणच्या दुर्दशेकडे पाहून अनेकजण व्यक्त करत आहेत.

दरम्यान, सदर स्मारकाच्या कंपाऊंडची व त्यावरील लोखंडी ग्रिलची मोडतोड झाली असून पुतळा उभा असलेल्या चौथर्याचीही पडझड झालेली आहे. कागदे लावून पुतळ्याखालील कोनशिला झाकण्यात आली असून; निवडणूक आचारसंहिता काळात ही झाकण्यात आलेली कोनशिला अद्याप उघडण्यात आलेली नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
प्रशासनाच्या पातळीवर कोणताही भेदभाव न राखता सर्व स्मारके आणि पुतळे यांची स्वच्छता, डागडुजी आणि रंगरंगोटी करून फलटण शहराच्या सौंदर्यात भर पाडावी. येत्या १२ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण यांची जयंती असून त्यापूर्वी या ठिकाणच्या सुशोभीकरणाचे काम सुरु व्हावे, अशी भावना फलटणकर नागरिक व्यक्त करीत आहेत.