अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेच्या लाभार्थ्यांना आधारकार्ड सत्यापन सक्तीचे : तहसिलदार अभिजीत जाधव

अन्यथा लाभ बंद होण्याची शक्यता; २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत

। लोकजागर । फलटण । दि. १२ फेब्रुवारी २०२५ ।

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार फलटण तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेचा लाभ घेणार्‍या सर्व शिधापत्रिकाधारकांनी शिधापत्रिकेवर नाव असणार्‍या सर्वांचे आधारकार्ड सत्यापन (व्हेरीफीकेशन) करुन घेणे सक्तीचे असून ज्याचे सत्यापन होणार नाही, त्यांचे शिधापत्रिकेतून नाव वगळले गेल्यास किंवा त्यांचा लाभ बंद झाल्यास, सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिधापत्रिका धारकाची राहील, तरी याकामी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन फलटणचे तहसिलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

याबाबत डॉ. अभिजीत जाधव यांनी नमूद केले आहे की, अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेचा लाभ घेणार्‍या शिधापत्रिकाधारकांनी आपल्या रास्तभाव दुकानदाराकडे जाऊन २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत शिधापत्रिकेवर नाव असणार्‍या प्रत्येकाचे आधारकार्ड सत्यापन करुन घ्यावे.

तसेच शिधापत्रिकेमधील जे सदस्य मयत आहेत अशा सदस्यांचे नाव तात्काळ कमी करुन घेण्यासाठी मयत व्यक्तीचा मृत्युदाखला, आधारकार्ड व शिधापत्रिका घेऊन तहसिल कार्यालय, फलटण येथील पुरवठा शाखेस संपर्क साधावा, असेही आवाहन तहसिल कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Spread the love