ऊसाची पाचट शेतामध्ये कुजवून सेंद्रिय कर्ब वाढवावा : डॉ. राजेंद्र भिलारे

सासकल येथे ऊस पाचट व्यवस्थापनाविषयी शेतकर्‍यांना मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी डॉ. राजेंद्र भिलारे, डॉ. दत्तात्रय थोरवे, दत्तात्रय गायकवाड, शहाजी शिंदे, अशोक जगदाळे, सचिन जाधव आदी.

कृषि विभागामार्फत सासकल येथे ऊस खोडवा पाचट व्यवस्थापन व फुले सुपरकेन ऊस प्लॉट प्रक्षेत्र भेट संपन्न

। लोकजागर । फलटण । दि. १४ फेब्रुवारी २०२५ ।

‘‘ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी खोडवा नियोजन करताना ऊसाची पाचट न जाळता पाचट शेतामध्ये कुजवून सेंद्रिय कर्ब वाढवावा’’, असे आवाहन पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे यांनी केले.

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी वाघजाई मंदिर, सासकल (ता. फलटण) येथे ऊस खोडवा पाचट व्यवस्थापन व सुपर केन नर्सरी या विषयावरती मार्गदर्शन आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. राजेंद्र भिलारे बोलत होते. दरम्यान, याच उपक्रमाचा भाग म्हणून गावातील गोरख मुळीक यांच्या शेतावर ऊस खोडवा पाचट व्यवस्थापन प्रत्यक्ष कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे ऊस बेणे विक्री अधिकारी डॉ. दत्तात्रय थोरवे, फलटण तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, विडणी मंडळ कृषि अधिकारी शहाजी शिंदे, विडणी कृषि पर्यवेक्षक अशोक जगदाळे, महाराष्ट्र शासन कृषी सेवा रत्न पुरस्कार प्राप्त सचिन जाधव तसेच सासकल व परिसरातील प्रगतशील ऊस बागायतदार शेतकरी उपस्थित होते.

डॉ. राजेंद्र भिलारे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, ‘‘ऊसाची पाचट न जाळता खोडवा नियोजन करून ऊस तुटून घेल्यावर उसाचे वर तोडलेले बुडके कोयत्याने छाटून त्यावरती बुरशीनाशक व कीटकनाशक फवारणी करावी. तसेच पाचट कुजण्यासाठी १० किलो जिवाणूचा वापर एकरी ५० किलो नत्र, स्फुरद ५० किलो, वरील प्रमाणे खत मात्र १५ दिवसाच्या ऊस तुटल्यानंतर द्यावे जेणेकरून पाचट खुजण्यासाठी मदत होईल. खोडवा पिकासाठी खताचे नियोजन करताना हेक्टरी २५० किलो नत्र, ११५ किलो, स्फूरद व ११५ किलो पालाश द्यावे त्यापैकी ऊस तुटल्या नंतर १५ दिवसाच्या आतमध्ये ५० टक्के खत मात्रा द्यावी. उरलेले खत मात्र ऊस तुटल्या नंतर १२० दिवसांनी द्यावे. तसेच खत देताना पहारी च्या माध्यमातून मुळाच्या सानिध्यात द्यावी.’’

डॉ दत्तात्रय थोरवे यांनी उसाच्या विविध नवीन विकसित ऊस जात फुले ऊस 15012, फुले ऊस 13007 आणि फुले ऊस 15006 या ऊस उसाच्या जाती विषयी माहिती दिली. तसेच विद्यापीठाने शिफारस केलेल्या फुले सुपरकेन नर्सरी ऊस रोपे निर्मिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये ऊस रोपे बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी, फलटण तालुक्यात एकूण ६८० फुले सुपर केन नर्सरीद्वारे ऊसाची लागवड केली आहे. त्यापैकी सासकल गावातील १८ शेतकर्‍यांनी सुपर केन नर्सरीद्वारे ऊसाची लागवड केली असल्याचे सांगितले

मच्छिन्द्र मुळीक यांनी कृषि विभागाच्या मार्गदर्शनाखाली फुले सुपर केन नर्सरी द्वारे रोपे तयार करून ७ फूट पट्टा पद्धतीने लागवड केलेल्या ऊस प्लॉटचे उत्कृष्ट नियोजन असल्याचे सांगून एकरी १०० टनापर्यंत लक्ष शक्य होणार असल्याचे ऊस प्लॉट पहाणी प्रसंगी डॉ. राजेंद्र भिलारे यांनी सांगितले.

सूत्रसंचालन व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन महाराष्ट्र शासन कृषी सेवा रत्न पुरस्कार प्राप्त सचिन जाधव यांनी केले होते.

Spread the love