आमदारांनी श्रेयवाद थांबवावा; अधिकार्‍यांनी प्रोटोकॉल पाळावा : दीपक चव्हाण यांचा इशारा

। लोकजागर । फलटण । दि. १५ फेब्रुवारी २०२५ ।

‘‘विद्यमान आमदारांना सहा महिने नारळ फोडण्याचं काम पुरेल इतकी विकासकामे आम्ही यापूर्वीच मंजूर करुन घेतलेली आहेत. आम्ही मंजूर करुन घेतलेल्या कामांचा श्रेयवाद त्यांनी थांबवावा. अधिकार्‍यांनीही कुणाच्या दबावाखाली न येता प्रोटोकॉलप्रमाणे वागावे’’, असा इशारा माजी आमदार दीपक चव्हाण यांनी दिला.

फलटण शहरात काल झालेल्या नवीन एस.टी. बसेसच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ‘लक्ष्मी विलास’ या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दीपक चव्हाण बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताबापू अनपट, माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर आदींची उपस्थिती होती.

एस.टी.बसचा निर्णय धोरणात्मक

‘‘नवीन बसेस आगारात येणं यात काहीही नवीन नसून गेल्या 30 वर्षात आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वात अशा पद्धतीने अनेकदा नवीन बसेस आलेल्या आहेत पण आम्ही त्याची प्रसिद्धी कधी केलेली नाही. नवीन एस. टी. बसेसबाबत सन 2021 – 22 सालापासूनची आमची शासनाकडे मागणी होती. याबाबत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत बैठकाही झाल्या होत्या. परंतु त्यावेळी शासनाने कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नव्हता. गेल्या पाच वर्षात सत्तेत आणि विरोधात दोन्हीकडे काम करताना एस.टी.बसेसची मागणी आम्ही केली होती. फलटण आगारात आलेल्या 10 नवीन बसेसचे श्रेय घेण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला आहे. मात्र आत्ता आलेल्या एस.टी.बसेस या केवळ फलटणसाठी आलेल्या नसून संपूर्ण राज्यात अशा नवीन बसेस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.’’, असे दीपक चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.

विरोधकांनी फुकटचं श्रेय घेवून नये

‘‘फलटण एस.टी. डेपो बारामतीसारखा करणार असल्याचं ते सांगत आहेत. परंतु बस स्थानकातील बरीचशी कामे आमच्या काळात झालेली आहेत. आम्ही आणलेल्या 4-5 कोटीच्या निधीतून बसस्थापकात काँक्रीटीकरण, पेव्हींग ब्लॉकचं काम झालेलं आहे. बारामतीला जाणार्‍या गाड्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. बसस्थानकाची पुर्वीची अवस्था बदलली असून त्यांना त्यात आणखीन सुधारणा करायच्या असतील तर त्या कराव्यात परंतु आम्ही केलेल्या कामांचं फुकटचं श्रेय घेऊ नये आणि लोकांची दिशाभूल करणं थांबवावं’’, असेही दीपक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

अधिकार्‍यांनी प्रोटोकॉल पाळावा

‘‘फलटण शहरासाठी विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी आम्ही आणला आहे. ती विकासकामे शहरात सुरु आहेत. परंतु या कामांची अडवणूक करायची, त्या कामांचे नारळ फोडायचे असे प्रकार विरोधकांनी थांबवावेत. नारळ फोडायला हरकत नाही पण आम्ही आणलेल्या कामांच्या ठिकाणी आम्हाला बोलावलं पाहिजे. याबाबतीत अधिकार्‍यांनीही नियमांना धरुन कुठलाही पक्षपाती पणा न करता, कुणाच्याही दबावाखाली न येता काम केले पाहिजे. प्रोटोकॉल पाळून आम्हालाही बोलावलं पाहिजे. याबाबत अधिकार्‍यांनाही योग्य त्या पद्धतीने सूचना देणार आहोत’’, असा इशारा दीपक चव्हाण यांनी दिला.

Spread the love