। लोकजागर । सातारा । दि. १५ फेब्रुवारी २०२५ ।
शिवजयंती महोत्सव समिती, सातारा यांच्यावतीने आयोजित शिवजयंती महोत्सवाअंतर्गत सोमवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील पहिले ‘शिवसाहित्य संमेलन’ संपन्न होणार आहे. या महोत्सव समितीचे निमंत्रक तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्त्वात आयोजित हे संमेलन इतिहास प्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.
शाहू कला मंदिर, सातारा येथे आयोजित या साहित्य संमेलनाचे उद्घाटन दिनांक १७ रोजी सकाळी १० : ३० वाजता खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तर खा.डॉ.विनय सहस्त्रबुद्धे, सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, सातारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

संमेलनाच्या पहिल्या सत्रात सकाळी ११ : ३० ते दुपारी १ : ३० या वेळेत ‘छत्रपती शिवराय व स्वराज्याचे शिलेदार’ या विषयावर सौरभ कर्डे तर ‘थोरली मसलत’ या विषयावर शैलेश वरखडे यांचे व्याख्यान होणार आहे.
दुसर्या सत्रात दुपारी २ : ०० ते ३ : ०० या वेळेत कु. पियुषा भोसले व सहकलाकारांकडून शिवशाहिरांचे पोवाडे सादरीकरण होणार आहेत. यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन या विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तिसर्या सत्रात दुपारी ३ : ३० ते ५ : ३० या वेळेत ‘छत्रपतींची युद्धनिती’ या विषयावर मोहन शेटे तर ‘छत्रपतींचे दुर्गवैभव’ या विषयावर प्रा. प्र. के. घाणेकर यांचे व्याख्यान होणार आहे.
संमेलनाचा सांगता समारंभ सायंकाळी ७ : ०० वाजता ‘गोष्ट इथे संपत नाही’ या नाट्यातील ‘अफजलखान वध’ या आवृत्तीचे सारंग मांडके व सारंग भोईरकर हे सादरीकरण करणार आहेत. यावेळी सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.
संमेलनस्थळी विविध प्रकाशकांच्या स्टॉल्सवर इतिहासाच्या अभ्यासकांना आणि विद्यार्थ्यांना ऐतिहासिक पुस्तके खरेदीसाठी सवलतींच्या दरात उपलब्ध राहणार असून या संमेलनास सातारा जिल्ह्यातील इतिहास प्रेमींनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन संमेलन संयोजन समितीचे प्रमुख ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, संमेलन कार्याध्यक्ष विनीत कुबेर, संमेलन नियोजक अमोल मोहिते, संमेलन कार्यवाह विनोद कुलकर्णी यांनी केले आहे.