पालिका प्रशासनासमोर पेच
। लोकजागर । फलटण । दि. १७ फेब्रुवारी २०२५ ।
फलटण शहरात दर रविवारी भरणार्या आठवडा बाजारच्या बाजार तळावरुन गोंधळ उडाला असून नक्की व्यापार्यांचे ऐकायचे की भाजी विक्रेत्यांचे? असा पेच पालिका प्रशासनासमोर उभा राहिला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यावर पालिका प्रशासन काय ठोस भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फलटण शहरात प्रत्येक रविवारी आठवडा बाजार भरत असतो. गेल्या दोन – तीन वर्षांचा कालावधी सोडला तर त्यापूर्वी शहरातील उमाजी नाईक चौक ते डेक्कन चौक, उमाजी नाईक चौक ते शिवशक्ती चौक आणि उमाजी नाईक चौक ते फलटण नगरपरिषद इमारत असा आठवडा बाजार भरवला जात होता. त्यानंतर गेल्या दोन – तीन वर्षात या बाजारतळाचे स्थलांतर माळजाई मंदीरासमोरील रस्ता ते गिरवी नाका परिसर असा विस्तारला.

गेल्या डिसेंबरमध्ये प्रशासनाने माळजाई मंदिर नजिक बसणारा बाजार पुन्हा जुन्या ठिकाणी नेला. या ठिकाणच्या व्यापार्यांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जात होते. मात्र या स्थलांतराविरोधात भाजी विक्रेते विरोध करत होते. अपुरी जागा, त्यामुळे होणारी वाहतुक कोंडी, लोकांची गर्दी, दुकानदारांचे असहकार्य, यातून वाद-विवाद अशा अडचणींचा परिणाम भाजी-पाला विक्रीवर होत असून आर्थिक नुकसान होत आहे, असे कारण देत कालच्या रविवारचा भाजी विक्रेत्यांनी पुन्हा एकदा माळजाई मंदिर परिसरासमोरील रस्त्यावर बाजार भरवला. इथून पुढे इथेच बाजार भरवावा; अन्यथा आम्ही आमचा माल रस्त्यावर ओतून देवून आंदोलन करु; असा पवित्राही भाजी विक्रेत्यांनी दाखवला.
दरम्यान, स्थलांतरीत बाजारतळावर भाजी विक्रेत्यांना अडचण येवू नये म्हणून पालिकेने भागनिहाय पालिका कर्मचार्यांची नियुक्ती केली होती. बाजारात वाहनांना बंदी घालण्यात आली होती तसेच पार्किंगसाठी पालिकेशेजारील पार्किंगचा वापर करण्याचेही आवाहन करण्यात आले होते. मात्र यातून भाजी विक्रेत्यांचे समाधान होताना दिसत नाहीये.
विक्रेत्यांची संख्या लक्षणीय
पूर्वीच्या ठिकाणी ज्यावेळी बाजार भरत होता त्यावेळी जागेचा प्रश्न जाणवत नव्हता मात्र कोवीडच्या कालावधीपासून भाजी विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. त्यामुळे तो परिसर आता अपुरा पडतो आहे, असे मत फलटणकरांमधून व्यक्त होत आहे.
पालिकेच्या भूमिकेकडे लक्ष
आठवडा बाजारतळाच्या निश्चितीवरुन बाजारपेठेतील स्थानिक व्यापार्यांची मागणी ऐकायची की भाजी विक्रेत्यांच्या तक्रारींचा निपटारा म्हणून त्यांच्या मागणीप्रमाणे निर्णय घ्यायचा; अशा कात्रीत पालिका प्रशासन सापडले असून यावर कोणती भूमिका घेतली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.