साताऱ्यात मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रम

सातारा नगरपालिका, मसाप शाहुपुरी शाखेचा संयुक्त उपक्रम

। लोकजागर । सातारा । दि. २१ फेब्रुवारी २०२५ ।

राज्यातील पहिला मराठी भाषा पंधरवडा मसाप, पुणे शाहुपुरी शाखा आणि सातारा नगरपालिकेच्यावतीने सुरु करण्यात आला. यंदा या मराठी भाषा पंधरवड्याचे १४ वे वर्ष असून २७ फेब्रुवारी ते १६ मार्च  २०२५  या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मसाप पुणे, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत  यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.


पत्रकात, साताऱ्यात साहित्यिक चळवळीत महत्वाचे योगदान देणाऱ्या मसाप, शाहुपुरी शाखेचे संस्थापक अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली १४ वर्षापूर्वी सातारा नगरपालिकेच्या सहकार्याने राज्यातील मराठी पहिला मराठी भाषा पंधरवडा सुरु करण्यात आला. कवी कुसुमाग्रज यांची जयंती आणि वि.दा.करंदीकर यांचा स्मृतीदिनाचे औचित्य साधून या कालावधीत विविध कार्यक्रम घेतले जातात. याहीवर्षी श्री. विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली भाषा पंधरवड्याचे नियोजन करण्यात आले आहे.  त्याचा प्रारंभ मंगळवार दि. २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हॉल येथे होणार आहे.


मराठी भाषा पंधरवड्याचे उद्घाटन ‘रावण’ या पुस्तकाचे  लेखक, प्रेरणादायी व्याख्याते शरद तांदळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी खा.श्री.छ.उदयनराजे भोसले हे असणार आहेत. सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, माजी उपनगराध्यक्ष मनोज शंेडे, दै.सकाळचे सहयोगी संपादक राजेश सोळसकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. शनिवार दि.१ मार्च रोजी पाठक हॉलमध्ये सायंकाळी ६ वाजता अंजली चिपलकट्टी यांचे माणूस असा का वागतो ?या विषयावर व्याख्यान होणार आहे. याप्रसंगी मसाप पुणे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, अश्वमेध ग्रंथालय, वाचनालयाचे अध्यक्ष रवींद्र झुटींग, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांची प्रमुख उपस्थिती आहे. सोमवार दि.३ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता शाहू कलामंदिर येथे प्रसिध्द अभिनेते सुबोध भावे यांची प्रकट मुलाखत होणार आहे. मसाप,पुणेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे हे मुलाखत घेणार आहेत. यावेळी मसाप पुणे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी, आम्ही पुस्तकप्रेमी ग्रुपचे प्रतिनिधी श्रीराम नानल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. बुधवार दि. ५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता पाठक हॉल येथे सातारा नगरपरिषद, मसाप, पुणे शाहुपुरी शाखा आणि श्री.छ. प्रतापसिंहराजे (थोरले) भोसले नगरवाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने नामवंत लेखकांच्या पुस्तकांचे व विविध मासिकांचे मुखपृष्ठकार व ख्यातनाम चित्रकार रविमुकुल यांची मुखपृष्ठाची गोष्ट हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी अजित कुबेर, विजय पंडित, डॉ.राजेंद्र माने, डॉ.संदीप श्रोत्री यांची प्रमुख उपस्थिती आहे.


रविवार दि. ९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता पाठक हॉल येथे एक भाकर तीन चुली या प्रसिध्द पुस्तकाचे लेखक श्री.देवा झिंजाड यांची प्रकट मुलाखत होणार आहे. मसाप पुणेचे प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, मसाप, पुणे कार्यवाह शिरीष चिटणीस हे मुलाखत घेणार आहेत. यावेळी विजय बडेकर, किशोर शिंदे, डॉ. चेतना माजगावकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. बुधवार दि. १२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता पाठक हॉलमध्ये व्याख्यान होणार आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित सुनीलकुमार लवटे यांचे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याविषयी व्याख्यान होणार आहे. यावेळी मसाप पुणे जिल्हा प्रतिनिधी राजन लाखे, कूपर कॉपोरेशनचे नितीन देशपांडे, दै.प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.


मराठी भाषा पंधरवड्याचा समारोप रविवार दि.१६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता शाहू कलामंदिर येथे होणार आहे. याप्रसंगी नामवंत निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या पंच्याहत्तरीनिमित्ताने सत्कार व मुलाखत होणार आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची विशेष उपस्थिती असणार आहे. स्नेहल दामले, घन:श्याम पाटील हे मुलाखत घेणार आहेत. यावेळी अभिजित बापट, अविनाश कदम, अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण  यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मराठी भाषा पंधवड्याच्या कार्यक्रमास सर्व साहित्यप्रेमी, सातारकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन असे आवाहन, मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्याध्यक्ष ॲड. चंद्रकांत बेबले, उपाध्यक्ष विक्रम पाटील, प्रमुख कार्यवाह अजित साळुंखे, कार्यवाह संजय माने, कोषाध्यक्ष सचिन सावंत आणि सदस्यांनी केले आहे.

Spread the love