। लोकजागर । फलटण । दि. २२ फेब्रुवारी २०२५ ।
फलटण तालुक्यातील सुमारे २९७८ घरकुलांचा पहिला हप्ता आज दिलेला आहे. फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी मी झालो आणि सगळ्यात जास्त घरकुल मी फलटण तालुक्याला देवू शकलो याचा मनापासून आनंद आहे, असे प्रतिपादन फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी केले.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत फलटण पंचायत समिती येथे लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र व पहिला हप्ता वितरण आ. सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश कुंभार, माजी नगरसेवक सुदामराव मांढरे, माजी पंचायत समिती सदस्य संजय कापसे, माजी सरपंच रवी धुमाळ, बंडू शिंदे, सोमनाथ यजगर, संदीप गोळे, विठ्ठल अंबोले आदींसह तालुक्यातील लाभार्थी उपस्थित होते.

आ. सचिन पाटील पुढे म्हणाले, ९६९ घरे मंजूर आहेत. त्यांच्या तांत्रिक अडचणी सोडवल्या जातील. गावागावातील सरपंचांच्या माध्यमातून जागेच्या उपलब्धतेबाबत माहिती घेवून घरकुलांबाबतच्या जागेचा प्रश्न सोडवला जाईल. याशिवाय तालुक्यात आणखीन कोणी घर नसलेले गोरगरीब राहिले असतील त्यांची नोंदणी 15 एप्रिल पासून आपण करुन घेवून त्यांनाही लवकरात लवकर आपण घरकुल मंजूर करुन घेणार आहे.
राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार गतिमान आहे. गरिबातल्या गरिब घटकाला राज्य आणि केंद्र सरकार विविध योजनांचा लाभ देत आहे, असेही आ. सचिन पाटील यांनी आवर्जून नमूद केले.