। लोकजागर । कराड । दि. २४ फेब्रुवारी २०२५ ।
देशाचे थोर नेते दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी दिवंगत सौ. वेणूताई चव्हाण यांचा जन्म २ फेब्रुवारी १९२६ रोजी फलटणमध्ये झाला. यंदाच्या वर्षी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात झाली असून फलटणच्या या सुकन्येच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर सौ. वेणूताई चव्हाण ट्रस्ट, कराड यांच्याकडून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याबाबतची उपक्रमांबाबतची सविस्तर माहिती राज्याचे माजी सहकार मंत्री तथा सौ. वेणूताई चव्हाण ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या नियोजित उपक्रमांबाबत माहिती देताना बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, कराड येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, वेणूताई चव्हाण कॉलेज, सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दिवंगत वेणूताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी वेणूताईंच्या जीवनावरील विशेष स्मरणिकेचं प्रकाशन तसेच वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये वेणूताईच्या अर्ध पुतळ्याचं अनावरण शरद पवारांच्या हस्ते होणार आहे.

वेणूताईंच्या जन्मशताब्दी निमित्तानं १० मार्च रोजी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा, एप्रिलमध्ये महिला आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. तसेच १ मे रोजी देवराष्ट्रे, विरंगुळा, वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, यशवंतराव चव्हाण स्मृती सदन, प्रीतीसंगम समाधी स्थळ, वेणूताई चव्हाण कॉलेज या ठिकाणी महिला भेटी आयोजित करण्यात आल्या आहेत.
फलटणहून १ जून रोजी कराडला ज्योत आणण्यात येणार आहे. जुलैमध्ये महिला बचतगटांची एकदिवसीय कार्यशाळा आणि महिला बचतगट उत्पादन साहित्य प्रदर्शन, वृक्षारोपण, ऑगस्टमध्ये चित्रकला स्पर्धा, सप्टेंबर महिन्यात जप साधना आणि राज्यस्तरीय सुगम गायन स्पर्धा होणार आहे. ऑक्टोबरमध्ये मध्यवर्ती युवा महोत्सव, रक्तदान शिबिर तर २५ नोव्हेंबर रोजी मॅरेथॉन स्पर्धा, आंतरविभागीय महिला क्रीडा स्पर्धा होणार आहेत.
जन्मशताब्दी निमित्त वेणूताई चव्हाण कॉलेजमधील प्राध्यापकांची कराडमधील शाळा, महाविद्यालयांमध्ये वर्षभर व्याख्याने होणार आहेत.
जन्मशताब्दी सोहळ्याच्या अखेरच्या टप्प्यात डिसेंबरमध्ये ’ही ज्योत अनंताची’ या ग्रंथाचं तसंच जात्यावरच्या ओवी संग्रहाचं प्रकाशन होणार आहे. जानेवारी २०२६ मध्ये लोककला जागर, सौ. वेणूताई चव्हाण जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा होईल. १ फेब्रुवारी २०२६ ला जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता, अशा भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले असल्याचे, बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.