शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन

। लोकजागर । विशेष लेख । दि. 10 जून 2025 ।

राज्यामध्ये नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन (National Mission on Natural Farming-NMNF) ही महत्वाकांक्षी योजना सन २०२४-२५ पासून राबविण्यात येत आहे. या मिशनची अंमलबजावणी भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण विभाग व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे, बाह्य निविष्ठा खरेदी न करणे, निसर्गावर आधारित शाश्वत शेती प्रणाली विकसित करणे, मातीचे आरोग्य आणि सुपीकता पुनरुज्जीवित करणे, पाण्याची गुणवत्ता वाढवणे, जैवविविधता जतन करणे आणि शेतकरी त्यांचे कुटुंब आणि ग्राहकांना सुरक्षित, आरोग्यदायी आणि पौष्टिक अन्न पुरवणे हे मुख्य मिशनचे उद्दिष्ट आहेत.

योजनेत केंद्राचा हिस्सा ६० टक्के व राज्याचा हिस्सा ४० टक्के या प्रमाणात निधी मंजूर आहे. योजनेअंतर्गत ५० हेक्टर क्षेत्राचा एक गट असे एकूण ५४ गट (२७०० हेक्टर क्षेत्र) १० तालुक्यातून निवडण्यात आलेले आहेत.प्रति शेतकरी १ एकर क्षेत्र याप्रमाणे एकूण ६ हजार ७५० शेतकरी निवड करण्याची कार्यवाही सुरू आहे.

प्रती गट २ कृषी सखी (Community Resource Persons-CRP) असे एकूण १०८ कृषी सखींची निवड करण्यात आलेली आहे. निवडलेल्या कृषीसखींना कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण देण्यासाठी जिल्ह्यात एकूण २ केव्हिके- कृषी विज्ञान केंद्र, बोरगांव ता. जि. सातारा व कृषी विज्ञान केंद्र, कालवडे, ता.कराड यांची निवड करणेत आलेली आहे. २८ एप्रिल ते २ मे २०२५ कलावधीत एकूण ४८ कृषी सखींचे ५ दिवसीय प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र, कालवडे, ता. कराड येथे पूर्ण झाले. उर्वरित कृषी सखींचे ५ दिवसीय प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र, बोरगांव, ता. सातारा येथे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नियोजन केले आहे. गावपातळीवर जन जागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यात एकूण ५८ ग्रामपंचायती निवड केली असून प्रत्येक गावामध्ये २ जन जागृती कार्यक्रम पूर्ण झालेले आहेत. सहभागी शेतकरी यांना प्रशिक्षण देणे. सहभागी शेतकऱ्यांच्या शेताचे नैसर्गिक शेती प्रमाणीकरण करणे. हे या योजनेंतर्गत समाविष्ट घटक आहेत.

नैसर्गिक शेती करणाऱ्या इच्छुक शेतक-यांसाठी अभ्यास साहित्य, फार्म डायरी, FAQ पुस्तिका इ. उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन साठी रक्कम 4 हजार रुपये प्रती एकर प्रती वर्ष याप्रमाणे २ वर्षासाठी अनुदान देय असणार आहे. कृषी सखी (CRP) यांना मानधन रक्कम 5 हजार रुपये प्रती महिना याप्रमाणे २ वर्षासाठी तरतूद आहे. कृषी सखी (CRP) यांना मोबाईल उपकरणांसाठी मदत मिळणार आहे.

भारतीय प्राकृतिक जैव-इनपुट संसाधन केंद्राची (BRC) स्थापना (गरजनुसार) – ३ गटांसाठी २ याप्रमाणे एकूण ५४ गटांमध्ये ३६ BRC स्थापन करणेत येणार आहे. यामध्ये नैसर्गिक शेती करणारे शेतकरी, शेतकरी गट, गोशाला, शेतकरी उत्पादक कंपनी, खाजगी संस्था लाभ घेऊ शकतात. यासाठी रक्कम रु.एक लाख इतके अनुदान देय आहे.कृषि सखींची निवड पूर्ण झाली असून शेतकऱ्यांची सुद्धा ९८ टक्के निवड झालेली आहे. निवड करणेत आलेल्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक शेती विषयी कृषि विज्ञान केंद्र येथे प्रशिक्षण माहे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करणेत आले आहे. सदर योजनेचा कालावधी २ वर्षाचा असून यामध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती विषयी प्रशिक्षण, बांधावर सेंद्रीय निविष्ठा निर्मिती, प्रमाणीकरण, प्रोत्साहनासाठी अनुदान इत्यादी बाबी राबविण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, 3 रा मजला, हजेरी माळ, सातारा येथे किंवा 02162-226822 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, सातारा.

Spread the love