फलटणच्या महसूल भवन इमारत उभारणी कामाला प्रशासकीय मान्यता

। लोकजागर । फलटण । दि. २५ फेब्रुवारी २०२५ ।

माढा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नातून फलटण शहरातील जुन्या रेव्हेन्यू क्लबच्या इमारतीच्या जागी नवीन महसूल भवन इमारत उभारण्याच्या कामाला शासनाच्या महसूल व वन विभागाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

मुख्य लेखाशिर्ष ४०५९ ०७९९ अंतर्गत राज्यातील विविध महसूली कार्यालये, निवासस्थाने कामांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबते प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले होते. त्यातील १६ प्रस्तावांना शासनाने मंजूरी दिली असून त्यामध्ये अंदाजित रुपये ९ कोटी ९५ लाख किंमतीच्या फलटण येथील महसूल भवन इमारत बांधकामाचा समावेश आहे.

दरम्यान, सध्याची रेव्हेन्यू क्लबची इमारत गेली अनेक दिवस दुरावस्थेच्या गर्तेत अडकलेली होती. या ठिकाणाहून तालुक्यातील गावकामगार तलाठी, मंडल अधिकारी यांचे कामकाज चालत असल्याने शेकडो लोकांची रोजची ये – जा येथे सुरु होती. या सर्वांना इमारतीच्या दुरावस्थेशी सामना करावा लागत होता. आता या इमारतीच्या पुर्नबांधणीचे काम होणार असल्याने महसूल विभागातील कर्मचार्‍यांसह तालुकावासियांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Spread the love