मराठी भाषा दिनानिमित्त फलटणला आज २४ वा ‘साहित्यिक संवाद’व ‘भयान राती’ कथासंग्रहाचे प्रकाशन

। लोकजागर । फलटण । दि. २७ फेब्रुवारी २०२५ ।

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ : ०० वाजता येथील नाना – नानी पार्क (विमानतळाशेजारी, फलटण) येथे २४ वा ‘साहित्यिक संवाद’ कार्यक्रम व लेखक अतुल चव्हाण लिखीत ‘भयान राती’ कथासंग्रहाचे प्रकाशन आयोजित केले असल्याची माहिती कार्यक्रम संयोजक तथा माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे व फलटण वनक्षेत्र अधिकारी राहुल निकम यांनी दिली.

कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती देताना ताराचंद्र आवळे व राहुल निकम यांनी सांगितले की, येथील साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन, वन विभाग आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्याच्या २७ तारखेला नाना – नानी पार्कमध्ये ‘साहित्यिक संवाद’ हा उपक्रम पार पडत असतो. आज या उपक्रमाची द्विवर्षपूर्ती होत आहे. आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ मुधोजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य विश्‍वासराव देशमुख, पांचगणी येथील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक तथा ज्येष्ठ लेखक जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे हे भूषविणार असून यावेळी फेडरल बँक, फलटणचे शाखा व्यवस्थापक अमोल अनासाने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक ज. तु. गार्डे हे करणार आहेत.

‘भयान राती’ कथासंग्रहाचे प्रकाशन

कार्यक्रमाचे औचित्य साधून मलटण येथील लेखक अतुल चव्हाण यांच्या ‘भयान राती’ या कथासंग्रहाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचेही संयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

तरी या मराठी भाषा गौरव दिन समारंभानिमित्त आयोजित साहित्यिक कार्यक्रमास फलटण शहर व परिसरातील लेखक, वाचक व साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ताराचंद्र आवळे व राहुल निकम यांनी केले आहे.

Spread the love