मराठी भाषादिनी फलटणच्या लेखकाचा मुंबईत गौरव
। लोकजागर । फलटण । दि. ०१ मार्च २०२५ ।
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटणचे, कार्यवाह चरित्र अभ्यासक व लेखक अमर शेंडे यांचा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबई येथील डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठा च्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत सन्मान करण्यात आला.
अमर शेंडे यांनी अभ्यासपूर्ण लिहिलेल्या महाराष्ट्राचे शिल्पकार आधुनिक मुंबईचे आद्य शिल्पकार नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट या चरित्राचा या विद्यापीठाच्या कला शाखा बी.ए. भाग (दोन) च्या अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार व अभ्यासक्रमात चरित्र समावेशाची पत्र विद्यापीठाच्या अधिष्ठाता व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.सौमित्र सावंत यांच्या हस्ते अमर शेंडे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी अमर शेंडे यांनी मुंबईचे शिल्पकार नामदार नाना जगन्नाथ शंकरशेट यांचे चरित्र नव्या पिढीला निश्चितपणे अभ्यासायला आवडेल असा विश्वास व्यक्त करून, मुंबईच्या जडणघडणीमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर, न्यायमूर्ती तेलंग, डॉ.भाऊ दाजी लाड, जमशेदजी जीजीभाई यांच्या ही कार्य कर्तुत्वाची ओळख नव्या पिढीला होणे गरजेचे असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रा. बाळासाहेब खोमणे यांनी केले.