फलटणमध्ये डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्वच्छता मोहीम; सुमारे २५ टन कचरा संकलन

उपक्रमात ९०० सदस्यांचा सहभाग

। लोकजागर । फलटण । दि. ०३ मार्च २०२५ ।

‘पर्यावरणाचा ध्यास आणि परिवर्तनाची’ आस या ध्येयाने कार्यरत असलेल्या डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने रविवार दिनांक ०२ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ : ०० ते १० : ३० वाजेपर्यंत फलटण येथील प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय ,सार्वजनिक बांधकाम कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय ,दिवाणी व फौजदारी न्यायालय ,उपजिल्हा रुग्णालय फलटण ग्रामीण आणि पंचायत समिती कार्यालय या सर्व शासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये अंदाजे ९०० प्रतिष्ठानच्या सदस्यामार्फत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात २५ टन ओला व सुका कचरा संकलन करून फलटण नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंड वरती पोहोच करण्यात आला.

या स्वच्छता अभियानामध्ये फलटण – कोरेगावचे आमदार सचिन कांबळे – पाटील , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण उपविभागीय अधिकारी विकास व्यवहारे, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, फलटण दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीमती खेडकर – गोयल मॅडम, फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अंशुमन धुमाळ आणि सर्व शासकीय कार्यालयातील सर्व शासकीय कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

या स्वच्छता अभियानात फलटण नगरपालिकेने संपूर्ण सहकार्य केले. अभियानामध्ये फलटण तालुक्यासह वाठार स्टेशन, लोणंद, निरा, धर्मपुरी, नातेपुते येथील सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तसेच हे स्वच्छता अभियान प्रतिष्ठान मार्फत संपूर्ण देशभर व विदेशात आजच्या दिवशी राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानाची फलटणमधील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Spread the love