अविस्मरणीय व आनंददायी दिवस ठरल्याची प्रतिक्रिया
। लोकजागर । सातारा । दि. ०३ मार्च २०२५ ।
जीवन शिक्षण विद्या मंदिर , मेढा येथून ४४ वर्षांपूर्वी सातवी पास होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी नुकताच अविस्मरणीय, आनंददायी आणि चिरंतन ऊर्जा देणारा असा दिवस ठरला.
या दिवशी मेढा येथील मंगलमूर्ती कार्यालयामध्ये १९७९-८० यावर्षीच्या सातवी पास झालेले सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी , आपल्या सर्व शिक्षकांसह पुन्हा भेटण्यासाठी एकत्र आले होते. ४४ वर्षांपूर्वीचे क्षण ओळीने रांगेत उभे राहून, प्रार्थना आणि प्रतिज्ञा म्हणून पुन्हा एकदा अनुभवले. श्री बाबुराव धनवडे गुरुजींनी पुन्हा एकदा १५ मिनिटे सर्वांचा इतिहासाचा तास घेतला. सर्वांनी आपली जीवन कहाणी थोडक्यात सांगितली. सुखदुःखांचे हितगुज केले. सर्व गुरुजनांचे पूजन केले. नमन केले. फुले उधळली. ओवाळले. गोडधोड खाण्यास दिले. त्यांना आठवणीत राहतील अशा भेटी दिल्या.

यामध्ये प्रत्येकाला सा रे ग म कारवाचा पेन ड्राईव्ह आणि एसडी कार्ड सह ५०० जुनी गाणी रेकॉर्ड केलेला रेडिओ सेट भेट दिला. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांची मने देखील भरून आली. बहुतेक सर्व शिक्षक ८० ते ९० वर्षाच्या आसपास होते. बाबुराव धनावडे गुरुजी , साहेबराव साळुंखे गुरुजी , निजाम सय्यद गुरुजी , दादाजी जांभळे गुरुजी , एकनाथ धनावडे गुरुजी, सौ.आशालता मोहिते , सौ सुनीता धनावडे , सौ सुशीला टकले हे आवर्जून उपस्थित राहिले. बांदल गुरुजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नव्हते. दिवंगत चिकणे गुरुजी तसेच सर्वांच्या लाडक्या सौ. सय्यद बाई यांची सर्वांना उणीव जाणवली.
मुंबई पुण्यापासून ते कर्नाटकातील मुधोळ धारवाड पर्यंत दूर दूरहून सगळे प्रचंड ओढीने एकत्र आले होते. सगळ्यांना किती बोलू आणि किती नको असं झालं होतं. कित्येक विद्यार्थ्यांच्या बरोबरच शिक्षकांच्याही डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. सर्वांना फेटे परिधान केले होते. कौतुकाने फोटो काढून घेतले. गुरुजनांच्या बरोबरच्या विविध पोजेस , अगदी सगळ्यांनी एन्जॉय केल्या. कोणी पाया पडतंय कोणी कान धरून घेतंय. कोणी रागवून घेतंय … जुन्या आठवणी एकमेकांना सांगतंय. कोणाच्या लहानपणीचे रुसवे फुगवे निघताहेत. कोणी कधी बोललेलंच नव्हतं. तर कधी कोणाच्या मनातला राग निघालाच नव्हता. सगळ्यांच्या भावनांचा बांध फुटून खळखळ वाहून सगळे निर्मळ आणि आनंदी होऊन बागडत होते. आठवणी , गाणी , गप्पा , चेष्टा मस्करी, खेळ , नृत्य असा हा सर्व कार्यक्रम अगदी सहजपणे एका सूत्रात गुंतून सर्वांना हसत खेळत ठेवण्याचं काम विशाल, शुभांगी आणि त्यांच्या टीमने अतिशय लीलया केले. आनंद शिंदेनी सर्वांना आवडेल असे सुग्रास असे जेवण देऊन या सगळ्या वरती चार चांद लावले. या कार्यक्रमाची आठवण म्हणून आपल्या शाळेच्या सध्या असलेल्या मुख्याध्यापिका सौ. रंजना सपकाळ बाई यांचेकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा भेट दिली.
शेवटी वेळ पुरता पुरत नव्हता पण एका क्षणी सर्वांना आपापल्या घरी निघावे लागणार होते. पाय निघत नव्हता. पण अखेरीस पाणवलेल्या डोळ्यांनी एकमेकांचा निरोप घेऊन पुन्हा लवकरच भेटण्याचा शब्द देत आपापल्या घरी निघाले.