‘गेाविंद’ मुळे दुग्ध व्यवसायातील महिला आघाडीवर : श्रीमंत सौ. शिवांजलीराजे

उच्च वंशावळीच्या स्पर्धेतील विजेत्या कालवडी समवेत श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, अन्य मान्यवर व स्त्री – पुरुष पशू पालक.

। लोकजागर । फलटण । दि. ०७ मार्च २०२५ ।

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे दुग्ध व्यवसाय आर्थिक दृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी गोविंद फौंडेशनने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून या क्षेत्रातील महिलाही मुक्त संचार गोठा, मुरघास आणि आता उच्च वंशावळीच्या कालवडी निर्माण करण्यात आघाडीवर असल्याचे गौरवोद्गार गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या संचालिका श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

गोविंद फौंडेशन, फलटण दुधेश्वर दूध संकलन केंद्र दुधेबावी आणि गोविंद महिला श्वेतक्रांती दूध संकलन केंद्र वांजळे यांच्या माध्यानातून आयोजित कालवड संगोपन स्पर्धेतील विजेत्या पशू पालक महिलांना गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसच्या संचालिका श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या, यावेळी गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस जनरल मॅनेजर (पशू सेवा विभाग) डॉ. शांताराम गायकवाड आणि दुधेबावी व पंचक्रोशीतील दूध उत्पादक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

उच्च वंशावळीच्या कालवडी निर्माण करण्यात महिलांची आघाडी
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उच्च वंशावळीच्या कालवडी निर्माण करण्यामध्ये सुद्धा महिला आघाडीवर असून चांगल्या पद्धतीची गाय आपल्याच गोठ्यात तयार व्हावी यासाठी त्या प्रयत्नशील आहेत ही बाब निश्चित प्रेरणादायी आणि अनुकरणीय असल्याचे श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

दूध उत्पादन व कालवड निर्मितीत महिला अग्रेसर
कालवड संगोपनातून चांगल्या गाई तयार करुन त्यांच्या विक्रीतून अधिक नफा मिळू शकतो हे महिलाना समजल्याने याबाबतही त्याआघाडीवर असून आज प्रत्येक पशू पालिकेच्या गोठ्यामध्ये अशा उच्च वंशावळीच्या कालवडी आहेत हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

दुग्ध व्यवसाय फायदेशीर व्हावा यासाठीचे प्रयत्नांना यश
प्रारंभी डॉ. शांताराम गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस प्रा. लि., फलटणचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व संचालिका श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून गोविंद डेअरीच्या प्रक्षेत्रामध्ये दूध उत्पादक पशू पालकांना त्यांचा दूध व्यवसाय हा मुख्य व्यवसाय फायदेशीर व्हावा, यामधून आर्थिक स्थैर्य निर्माण व्हावे दूध व्यवसायातील पशू पालक महिला व पुरुष योग्य प्रवाहात यावेत, एकात्मिक दुग्ध व्यवसाय पद्धतीतून त्यांनी आपला आर्थिक उत्कर्ष साधावा यासाठी विविध उपक्रम, प्रशिक्षण, तज्ञांची मार्गदर्शक शिबीरे आयोजित करुन माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करुन दिल्याचे स्पष्ट केले.

पशू पालक आता व्यवसायातील अर्थकारण, आधुनिकरण जाणतात
डॉ. शांताराम गायकवाड म्हणाले, पशू पालकांना दुग्ध व्यवसाया मधील अर्थकारण, आधुनिकरण व कमी मनुष्य बळात व्यवसाय कसा फायदेशीर करता येईल यादृष्टीने विविध योजना पशू पालकांच्या गोठ्यापर्यंत अत्यंत उत्तम पद्धतीने राबविण्यात आल्याचे निदर्शनास आणून देताना विशेषत: गोविंद कामधेनू वंशसुधार योजना प्रभावीपणे जवळपास ४५ हुन अधिक कृत्रिम रेतन केंद्रांच्या माध्यमातून प्रक्षेत्रात राबविण्यात येत आहे, तसेच प्रक्षेत्रामध्ये गर्भ प्रत्यारोपण तंत्रज्ञान त्यामध्ये प्रामुख्याने देशी व त्याच बरोबर एचएफ जर्सी या जातीचा समावेश आहे. त्याचा परिणाम स्वरुपात
आज गोविंद डेअरीच्या प्रक्षेत्रामध्ये सुमारे साडेबारा हजाराहून अधिक जातिवंत कालवडीची निर्मिती झाल्याचे निदर्शनास आणून दिले.

पशू पालकांनी कालवड संगोपन शास्त्रीय पद्धतीने करावे यासाठी स्पर्धा
दुधेबावी गावांमध्ये संकरित कालवड संगोपन स्पर्धा आयोजित करुन त्या माध्यमातून गोविंद हिरकणी ची निवड करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने एचएफ, जर्सी व क्रॉस बीड कालवडींचा सहभाग असल्याचे निदर्शनास आणून देत या स्पर्धेचा मुख्य उद्देश पशू पालकांनी कालवड संगोपन शास्त्रीय पद्धतीने करावे, कृत्रिम रेतन नोंदी व्यवस्थित ठेवाव्यात, पशू पालकांच्या दूध उत्पादन व दुधाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होईल या दृष्टीने ब्रीडिंग करत असताना काळजी घ्यावी व पशू पालकांमध्ये कालवड संगोपन विषयी जनजागृती निर्माण व्हावी हा उद्देश असल्याचे डॉ. शांताराम गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिले.

कालवड संगोपन आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय
या योजनेच्या माध्यमातून सर्व पशू पालकांना कालवड संगोपन हा महत्त्वाचा विषय व एक आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे, भविष्यातील दूध व्यवसायात कमी गाई मध्ये अधिक दूध उत्पादन व दूध गुणवत्ता मिळावी व पशू पालकांचा प्रति लिटर दूध उत्पादन खर्च कमी व्हावा या दृष्टीने पशू पालकांमध्ये उत्साह तयार व्हावा त्यांनी आपल्या फार्म मध्ये उच्च अनुवंशिक गुणधर्म असणाऱ्या वळूच्या वीर्यमात्रा वापरुन पुढील पिढीतील गुण दोष पाहून ब्रिडिंग करावे या दृष्टीने गोविंदच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांना यश आले असून आता उच्च वंशावळीच्या गाई खरेदीसाठी पंजाब किंवा अन्य प्रांतात जाण्याची आवश्यकता नसल्याचे डॉ. गायकवाड यांनी आवर्जून सांगितले.

गोविंदच्या या उपक्रमांमध्ये दुधेबावी व पंचक्रोशीतील पशू पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले, प्रामुख्याने २ ते ४ महिने, ५ ते ८ महिने, ९ ते १२ महिने या वयोगटातील कालवडींचा सहभाग होता आणि प्रत्येक वयोगटातील ३ विजेत्यांना प्रशस्तीपत्र ट्रॉफी व बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

उच्च वंशावळीच्या गाईंचे उत्पादन महाराष्ट्रात
यापूर्वी येथील पशू पालक पंजाब व इतर राज्यातून जास्त उत्पादन क्षम गायींची खरेदी करत होते, जेणेकरुन दूध उत्पादन वाढावे, आर्थिक स्थैर्य निर्माण व्हावे पण आज या योजनेच्या माध्यमात येथील पशू पालक शेतकऱ्यांना त्यांच्याकडे असणाऱ्या कालवडी दूध उत्पादन क्षम गाई विक्री संदर्भात मागणी वाढत असल्याने येथील शेतकरी दूध उत्पादनाबरोबर उच्च वंशावळीच्या उत्पादन क्षम गाई उत्पादनात आघाडी घेऊन समाधानी आहेत.

महिला पशू पालक प्रशिक्षित झाल्याने यशस्वी
पशू पालक महिला आपल्या गोठ्यातील सर्व कालवाडींच्या नोंदीचे उत्तम रेकॉर्ड ठेवतात, त्यामध्ये वळूचे कोड नाव व अन्य माहिती, तारखा व्यवस्थित नोंदवित असल्याने भविष्यात त्या कालवडी पासून आपणास कशा प्रकारे आर्थिक फायदा होऊ शकतो हे या दूध उत्पादक महिलांनी सर्व उपस्थित महिलाना माहिती दिली.  गोविंद डेअरीच्या पशू पालक हिताच्या विविध योजनांबद्दल प्रामुख्याने मुक्तसंचार गोठा, मुरघास, हायड्रोपोनिक, अझोला निर्मिती, सेंद्रिय खत निर्मिती, खत या सर्व योजना व त्याचा फायदा या बद्दल डॉ. शांताराम गायकवाड यांनी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी समवेदना दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका सौ. स्वाती पवार मुंजवडी, गोविंद महिला श्वेतक्रांती संकलन केंद्राच्या प्रमुख सौ. सुषमा नाळे, महिला सक्षमीकरण प्रकल्पाच्या प्रतीक्षा खेतमाळीस, दत्ता सोनकांबळे, विकास जाधव, गणेश चव्हाण, दुग्धव्यवसाय विकास अधिकारी व बहुसंख्य दुध उत्पादक महिला उपस्थित होत्या.

पुरस्कार वितरण
उत्कृष्ट कालवड संगोपन स्पर्धेतील खालील पशू पालकांना प्रशस्ती पत्र, सन्मान चिन्ह व रोख पारितोषिक देवून श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
१) २ ते ४ वयोगट
प्रथम क्रमांक : सौ. सुषमा शशिकांत नाळे, व्दितीय क्रमांक : सौ. शिला प्रविण नाळे.
२) ५ ते ८ वयोगट
प्रथम क्रमांक : सौ. सुषमा शशिकांत नाळे, द्वितीय क्रमांक : विजय जगन्नाथ सोनवलकर, तृतीय क्रमांक : सौ. अखिनी भालचंद्र नाळे,
३) ९ ते १२ वयोगट
प्रथम क्रमांक : सौ. उज्वला विनायक नाळे, व्दितीय क्रमांक : सौ. शिला हनुमंत चांगण, तृतीय क्रमांक : भाऊसाहेब साधू चांगण.

Spread the love