श्री क्षेत्र अयोध्या येथे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण व श्रीराम चरित्र कथा यज्ञ सुरु

ह.भ.प. बंडा महाराज कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यासह राज्यातील श्रीराम भक्त सहभागी

। लोकजागर । फलटण । दि. ०७ मार्च २०२५ ।

चार धाम पारायण समिती महाराष्ट्रच्या माध्यमातून श्री रामलल्ला जन्मभूमी श्री क्षेत्र अयोध्या नगरीमध्ये दि. १ ते ८ मार्च दरम्यान ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहोळा व श्रीराम चरित्र कथा यज्ञ श्री मणिरामदास छावणी सेवा ट्रस्ट, दिनबंधू नेत्रालयाजवळ, अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे सुरु आहे. युवकमित्र गुरुवर्य ह.भ.प. बंडा महाराज कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील श्रीराम भक्त बहुसंख्येने सहभागी झाले आहेत. ह.भ.प. काकासाहेब महाराज पहाणे दौंड हे व्यासपीठ चालक असून ह.भ.प. गुरुवर्य भरत महाराज पाटील जळगाव हे श्री रामकथा प्रवक्ते आहेत.

या सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातील ३७०० वाचक सहभागी असून संपूर्ण भारताचे श्रद्धास्थान श्रीराम जन्मभूमी, अयोध्या येथे महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी गीत रामायण,श्रीराम चरित्र कथा व सायंकाळी विद्वान महाराजांची किर्तने असा रामनाम जप कार्यक्रम अयोध्या नगरीमध्ये सुरु आहे.

या सोहळ्यात दि. १ ते ६ मार्च दरम्यान श्री गुरुवर्य ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर (पंढरपूर), गुरुवर्य ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीर (ठाणे), गुरुवर्य ह.भ.प. संदीपान महाराज हासेगावकर (अध्यक्ष, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी), गुरुवर्य ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले (अध्यक्ष, गाथा मंदिर, देहू), गुरुवर्य ह.भ.प. संजय महाराज पाचपोर अकोला, ह.भ.प. अनिल महाराज पाटील (बार्शी) यांची कीर्तन सेवा झाली आहे.

शुक्रवार दि. ७ रोजी गुरुवर्य ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर (पंढरपूर) यांची कीर्तन सेवा होणार असून शनिवार दि. ८ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत गुरुवर्य ह.भ.प. बंडा महाराज कराडकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रामभाऊ आनंदराव लेंभे यांनी सदिच्छा भेट दिली. अनेक मान्यवर येत आहेत, हरिनामाचा अनोखा आनंद श्रीराम जन्मभूमी मध्ये लाभत आहे.

Spread the love