जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा
। लोकजागर । मुंबई । दि. ०८ मार्च २०२५ ।
जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना शुभेच्छा देताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बंद होणार नसल्याचा पुनरुच्चार केला. लाडक्या बहिणींनी दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कल्याणकारी राज्याची निर्मिती केली. महिलांच्या सशक्तीकरणासाठी महिलांचे कल्याण आणि विकास हेच राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

जागतिक महिला दिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्माशताब्दी वर्षानिमित्त विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी प्रस्ताव मांडला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी महिला सन्मान आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतीय संस्कृतीत माता आणि मातृभूमीला अधिक महत्त्व दिले आहे. संविधानाने महिलांना मतदानाचा अधिकार देऊन समानता दिली आहे. भारत हा मातृभावनेने भरलेला देश आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर, जिजाऊमाता, राणी लक्ष्मीबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांसारख्या स्त्रियांमुळे महाराष्ट्राचा इतिहास समृद्ध झाला. नद्यांना सुद्धा आपण मातेसमान मानतो ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभारच नव्हे, तर सामाजिक सुधारणा, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि लोककल्याणकारी योजना यावरही भर दिला. त्यांच्या कार्यपद्धतीत शाश्वत विकासाची तत्त्वे होती ती आजही मार्गदर्शक आहेत. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.