। लोकजागर । सातारा । दि. १० मार्च २०२५ ।
विद्रोही मुल्ये आजच्या अंधाराच्या काळात जपुन ठेवायची जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे. त्याचसाठी विद्रोही संमेलनाचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन भालकी येथील बसव दृष्टी केंद्र चे डॉ. राजू जुबरे यांनी सातारा येथे बोलताना केले.

विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रचे सहावे संघटना अधिवेशनाचं उद्घाटन सातारा येथे झाले. विचारमंचाला माता भीमाबाई आंबेडकर विचारमंच असे नाव देण्यात आले आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन झाले. त्यावेळी बसव साहित्याचे अभ्यासक राजू जुबरे हे उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी ” आम्ही विद्रोही ” असे लिहिलेल्या मोठ्या फलकावर डॉ. आ. ह. साळुंखे , राजू जुबरे, वाहरू सोनावणे , डॉ. भारत पाटणकर, डॉ. बाबुराव गुरव, व्ही. वाय. आबा पाटील, दंगलकार नितीन चंदनशिवे, कॉ. धनाजी गुरव, डॉ जालिंदर घिगे, ज्योती अदाटे यांनी स्वाक्षरी केल्या.
राजू जुबरे यांनी उद्घाटन सत्राला संबोधित करताना म्हटले की , बसवण्णांनी स्थापन केलेल्या अनुभव मंडपाचं अध्यक्षस्थान अल्लम प्रभूंना दिलं होतं, त्यांनी वचनाच्या माध्यमातून विद्रोही परंपरा ताकदीनं मांडण्याचं काम केलं. ते भटक्या समुहातून आलेले होते. महात्मा बसवण्णांनी मध्ययुगात विद्रोहाची चळवळ सुरु केली. बसवण्णांनी मांडलेला विद्रोह हा परंपरागत मूल्यव्यवस्था उलटवून टाकून परिवर्तनवादी मूल्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी केला. मूल्यनिष्ठ परंपरा परिवर्तनवादी मूल्यांचा जागर करते. या मूल्यांना संपवण्यासाठी मूल्यद्रोह जन्माला आल्याचं दिसून येते. वेदनेची विकृती नाहिशी करुन संवेदनांची संस्कृती निर्माण करण्याचं काम बसवण्णांनी केलं. भाषेचा विद्रोह बसवण्णांनी पद्धतशीरपणे केल्याचं राजू जुबरे यांनी सांगून बाराव्या शतकात बसवण्णांनी साहित्याच्या माध्यमातून, भाषेच्या माध्यमातून विद्रोह केला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. आ.ह. साळुंखे यांनी विद्रोहीच्या राज्य अधिवेशनाला सदिच्छा देताना विद्रोही विचार थांबणार नाही असा विश्वास व्यक्त केला .
विद्रोही अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात दादासाहेब ढेरे, दंगलकार नितीन चंदनशिवे यांचा सत्कार करण्यात आला. नितीन चंदनशिवे यांनी या प्रसंगी कवितेचं सादरीकरण केलं.
सुरुवातीला सातारा विद्रोहीचे कार्यकर्ते अमित कांबळे, सादिका बागवान, रेवा चव्हाण, आरुष कांबळे, आस्तिका आगाशे, ऋतजा बैले, साक्षी बैले, संकेत माने, आशिष गडांकुश यांनी चळवळीची गाणी सादर केली.
प्रास्ताविक व स्वागत विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र चे उपाध्यक्ष विजय मांडके यांनी केले. आभार शिवराम ठवरे यांनी मानले. प्रा गौतम काटकर यांनी सुत्रसंचलन केले. या अधिवेशनाला राज्यभरातून कार्यकर्ते उपस्थित होते.