बाजार समितीच्या गाळेधारकांच्या भाडेवाढी विरोधात सत्ताधारी – विरोधक आमने सामने

भाडेवाढ अन्यायकारक असल्याचा नरसिंह निकमांचा दावा तर समन्वयातूनच भाडेवाढ ठरली असल्याचा भगवानराव होळकरांचा खुलासा

। लोकजागर । फलटण । दि. १३ मार्च २०२५ ।

फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या गाळेधारकांच्या भाडेवाढीच्या मुद्यावरुन सत्ताधारी व विरोधक आमने – सामने आले असून भाडेवाढ अन्यायकारक असल्याचा दावा अ‍ॅड. नरसिंह निकम यांनी केला आहे तर अ‍ॅड. नरसिंह निकमांच्या आरोपाला उत्तर देताना झालेली भाडेवाढ ही संचालक व गाळेधारकांच्या समन्वयातून ठरली असल्याचा खुलासा बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर यांनी केला आहे.

काय आहेत नरसिंह निकम व गाळेधारकांचे आरोप

या भाडेविरोधात गाळेधारक व फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड.नरसिंह निकम यांची बैठक पार पडली होती. यावेळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव उपस्थित होते. सदर बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आपल्या आरोपात अ‍ॅड. नरसिंह निकम यांनी म्हटले होते की, ‘‘फलटण बाजार समितीने गाळेधारकांना अन्यायकारक भाडेवाढ केलेली आहे. सहाशे रुपये असलेले भाडे बाराशे रुपये करुन त्यावर अठरा टक्के जीएसटी आकारला जात आहे. त्यामुळे झालेली चौदाशे पंच्याहत्तर रुपये इतकी भाडेवाढ कायद्यात आणि व्यवहारात बसत नाही. येथील गाळेधारकांना व्यवसाय नाही, बाजार समितीकडून कोणत्याही सुविधा मिळत नाहीत; अशा परिस्थितीत भाडेवाढ करुन जास्त रक्कम वसूल करायचा भ्रष्टाचारी कारभार बाजार समितीकडून सुरु आहे. ही अन्यायकारक भाडेवाढ आम्ही हाणून पाडणार आहोत. तसेच सन 2013 सालापासून बाजार समितीचे स्पेशल ऑडीट करावे ही मागणी आम्ही शासनाकडे करणार आहोत. या प्रश्‍नावर प्रसंगी उच्च न्यायालयात जाण्याची आमची तयारी आहे. तरी बाजार समिती व्यवस्थापनाने विचार करुन ही भाडेवाढ त्वरीत मागे घ्यावी’’

काकासाहेब निंबाळकर यांनी सांगितले होते की, ‘‘भाडेवाढ करताना ती थोड्याफार प्रमाणात करावी अशी मागणी आम्ही आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे केली होती. परंतु त्याला यश आले नाही.’’ ‘‘राज्यातील इतर बाजार समितीच्यातुलनेत फलटण बाजार समितीकडून आकारण्यात येणारे भाडे वेगळे आहे. बाजारसमितीकडून भाडे आणि कराबाबत अतिरेक केला जात असून याबाबत अनेकदा विनंत्या करुनही ही भाडेवाढ थांबवण्यात आली नाही’’, असे गौरव मदने यांनी म्हटले होते.

भगवानराव होळकरांचे प्रतिउत्तर

अ‍ॅड.नरसिंह निकम व गाळेधारकांच्या आरोपाला प्रतिउत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर यांनी आज सांगितले की, ‘‘फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने गाळेधारकांना 1989 साली 150 रुपये भाडे आकरणी केली होती. त्यानंतर 1999 साली त्यात वाढ करुन 300 रुपये भाडे करण्यात आले. तद्नंतर पुन्हा 10 वर्षांनी या भाड्यात 100% वाढ करुन 2009 साली 600 रुपये भाडे आकारणी केली होती. त्यांनतर कोणतीही भाडेवाढ केली गेली नव्हती. सन 2023 मध्ये भाडेवाढी संदर्भात संचालक आणि गाळेधारकांच्यात बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत समन्वयातून भाड्याचा दर निश्‍चित झाला आहे. त्यानुसार दर्शनी भागातील गाळ्यांना यापूर्वी 600 भाडे होते ते आपण 1250 केले आहे तर पाठीमागील बाजूस असणार्‍या गाळ्यांना 300 रुपये भाडे होते ते 650 रुपये करण्यात आले आहे. बाजार समितीच्या 75% गाळेधारकांनी त्यानुसार भाड्याचे पैसे भरलेले आहेत. मात्र काही मंडळी राजकीय स्वार्थापोटी बाजार समिती गाळेधारकांवर अन्याय करत आहे असं चित्र दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. शिवाय सन 2019 मध्ये पणन संचालकांनी पत्राद्वारे भाडेवाढी संबंधीचा निर्णय घेण्याचे पत्राद्वारे कळवले आहे. दर दहा वर्षांनी बाजार समिती 100% भाडेवाढ करत आहे. ही वाढेवाढ सन 2019 लाच व्हायला पाहिजे होती. त्यामुळे ही भाडेवाढ अवास्तव आहे असं अजिबात म्हणता येणार नाही. ’’

फलटण कृषी बाजार समितीत पार पडलेल्या या पत्रकार परिषदेस संचालक तुळशिराम शिंदे, समर जाधव, शरद लोखंडे, अक्षय गायकवाड, संतोष जगताप, निलेश कापसे, बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर उपस्थित होते.

दरम्यान, बाजार समितीच्या या खुलास्यावर भाडे वाढीला विरोध करणारे गाळेधारक व विरोधक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Spread the love