। लोकजागर । फलटण । दि. १३ मार्च २०२५ ।
खंडाळा तालुक्यातील पूर्वेकडील कोपर्डे गाव हे डोंगराच्या कडेला व टोकाचे असल्यामुळे बेसिक विकासापासून वंचित होते. दिपक शिंदे २०२१ मध्ये सरपंच झाल्यापासून गावाचा चौफेर विकासाला सुरुवात झाली व त्याची दखल घेऊन आज त्यांना दिल्लीत भारत भूषण नॅशनल एक्सेलन्स सरपंच अवॉर्ड २०२५ देवून सन्मानित करण्यात आले.

सरपंच म्हणून कार्यरत असताना डोंगराच्या कडेला असणारे कोपर्डे गाव पाऊस पडला की पाणी वाहून जात होते. जलसंधारणावरील महत्त्वपूर्ण काम टाटा कॅपिटल, बायफ सामाजिक संस्था व ग्रामस्थांच्या सहकार्याने सीएसआरच्या माध्यमातून जलसंधारणाची सर्व कामे करण्यात आली. त्यामुळे कित्येक कोटी लिटर पाणी भूगर्भात जिरल्यामुळे जवळजवळ शेती पिकांना जादा दोन महिने पाणी देता आले; असे शाश्वत काम करण्यात आले. स्मशानभूमी सुशोभीकरण, मोबाईल टॉवर साठी पीएमओ ऑफिस पर्यंत पाठपुरावा करून मोबाईल रेंजची सोय करण्यात आली. पिण्याचे पाण्याची गैरसोय लक्षात घेऊन पाण्यासाठी भरीव काम करताना दीड लाख लिटरची पाण्याची टाकी व ४ किलोमिटर पाईपलाईन, पहिली ते सातवी प्राथमिक शाळेसाठी गायरान मधील तीन एकर जागा; त्यामध्ये शाळा, शौचालय व सर्व प्रकारची सुसज्ज मैदाने यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे वर्ग करून प्रत्यक्षात शाळा बांधकाम सुरू झाले. वाड्यावस्त्यांना जोडणारे रस्ते, अंतर्गत रस्ते, गावातील बंदिस्त गटार, महिला सबलीकरण, वयोवृद्ध लोकांना बसण्यासाठी बाकडी बसवण्यात आली, सामाजिक सलोखा तसेच सर्वांना सन्मानाची वागणूक देऊन चार वर्ष काम करण्यात आले. या सर्व कामांची दखल घेत त्यांना दिल्लीमध्ये सन्मानित करण्यात आले.
या कामासाठी दिपक शिंदे यांना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, ना. शंभूराज देसाई, ना. मकरंद पाटील, ना. जयकुमार गोरे, खा. नितीन पाटील, मिलिंद पाटील व सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. तसेच दिल्ली येथे भारत भूषण नॅशनल एक्सेलन्स सरपंच अवॉर्ड २०२५ मिळाल्याबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.