। लोकजागर । फलटण । दि. १६ मार्च २०२५ ।
माढा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्यानुसार फलटण जिल्हास्तरीय दिवाणी न्यायालय मंजूर झाले आहे. याबाबतच्या कार्यवाहीचा आदेश निर्गमित झाल्यामुळे फलटणकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागणीनुसार फलटण तालुक्यासाठी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयास यापूर्वीच मान्यता मिळाली असून गतवर्षीपासून ते कार्यरत आहे. वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचा प्रस्ताव विधी व न्याय विभाग मंत्रालयाकडे अंतिम मान्यतेसाठी प्रलंबित होता. संबंधित न्यायालयाच्या कामकाजासाठी फलटणच्या लोकांना सातारा वारी करावी लागत असल्याने ते नागरिकांसाठी आणि वकीलांसाठी गैरसोयीचे ठरत होते. त्यामुळे हे न्यायालय तातडीने सुरु होणेकामी रणजितसिंह नाईक निंबाळकर व फलटणचे विद्यमान आमदार सचिन पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रयत्न केले होते.
आता सदरचे दिवाणी न्यायालय फलटण येथे सुरु करण्याच्या अनुषंगाने आदेश निर्गमित झाल्यामुळे लवकरच हे न्यायालय सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला असून नागरिकांसह वकीलांकरीता हे सुलभ होणार आहे. दरम्यान, फलटण वकील संघाच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.