। लोकजागर । सातारा । दि. १९ मार्च २०२५ ।
महाराष्ट्र शासन कृषि विभागा मार्फत २१ ते २३ मार्च २०२५ कालवधीत अलंकार हॉल, पोलिस करमणुक केंद्र, सातारा येथे पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करणेत आलेले आहे. याचा सातारा शहर वासियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

पौष्टीक तृणधान्यांचा आहारामध्ये समावेश केल्यास मधुमेह, बध्दकोष्ठता, आतड्याच्या आजारास प्रतिबंध होतो. तसेच तृणधान्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह, ह्यदयविकार, अॅनिमिया, उच्च रक्तदाब रोधक मानले जातात. त्यामुळे दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.
पौष्टिक तृणधान्य महोत्सवामध्ये माण, खंडाळा येथील देशी बाजरी, सातारा, खटावची देशी ज्वारी ,कराडची नाचणी, जावळी, पाटण चा देशी इंद्रायणी तांदुळ, खटावचा हिरवा मुग, कोरेगाव चा जीआय मानांकन प्राप्त वाघ्या घेवडा, वाई तालुक्यातील हळद तसेच फळांचे गाव धुमाळवाडी येथील विविध प्रकारची दर्जेदार फळे तसेच पोष्टिक तृणधान्यांपासुन तयार केलेल प्रक्रिया पदार्थ इ. वैशिष्ट्य पुर्ण व दर्जेदार उत्पादने शेतकरी गट, महिला बचत गट यांच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. थेट शेतक-यांच्या शेतातून ताजे व स्वच्छ अन्नधान्य खरेदीची संधी सातारकरांना मिळणार आहे.