साखरवाडी विद्यालयात ‘कौशल्य शिक्षणा’चा जागर; ‘लेंड अ हँड इंडिया’ संस्थेचा उपक्रम

। लोकजागर । फलटण । दि. २२ मार्च २०२५ ।

पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे कौशल्य शिक्षणाची अंमलबजावणी होणार असून त्याची प्रात्यक्षिक व व्याप्ती याविषयीचे मार्गदर्शन राष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधी मयूर लाड व विनायक जोशी यांनी नुकतेच साखरवाडी विद्यालय येथे केले.

20 मार्च रोजी साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग, साखरवाडी या शाळेमध्ये पुण्याच्या ‘लेंड अ हँड इंडिया’ या संस्थेच्या माध्यमातून कौशल्य शिक्षण या विषयावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. नवीन शैक्षणिक धोरण (एनईपी)2020 व राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यावर आधारित कौशल्य शिक्षणाचे महत्व, व्याप्ती व अंमलबजावणी बाबत चर्चासत्र कार्यक्रम घेण्यात आला. लेंड अ हँड इंडिया ही ना नफा तत्वावर काम करणारी स्वयंसेवी संस्था असून 2006 पासून महाराष्ट्रासह 25 राज्यांमध्ये 9वी ते 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य शिक्षणाचा प्रसार व प्रचाराचे काम करते आहे. लेंड अ हँड इंडिया संस्थेचे प्रतिनिधी मयूर लाड यांनी कौशल्य शिक्षण आधारित गिते, वक्तृत्व भाषणे, नृत्य यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सहभागतून मनोरंजक पद्धतीने कौशल्य शिक्षण या विषयांचे महत्व, स्वरूप आणि हेतू उद्देश याची मांडणी करून शाळेमध्ये जनजागृती केली. तसेच लाही प्रतिनिधी विनायक जोशी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यावर आधारित महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा यांच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून इ.6वी ते 10 वी साठी नवीन अभ्यासक्रम या संदर्भात मार्गदर्शन केले.

पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील व्होकेशनल बद्दलच्या सूचनांची अंमलबजावणी करणे, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील प्रचलित विषय व जीवन कौशाल्यांमधील सह-संबंध समजणे, कौशल्याधारित शिक्षण रुजवणे, हाताने काम करीत प्रत्यक्ष अनुभवातून आणि निरीक्षणातून शिकणे, विद्यार्थ्यांना कृतीवर आधारित शिक्षणातून विषय सोपे करून समजावणे, सर्व विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यासक्रमात समावेश, दैनंदिन जीवन आणि पाठ्यक्रमातील सहसंबंध यांच्यातील परस्पर पूरक संबंध समजण्यास मदत होते. इत्यादी प्रमुख विषयांची माहिती या जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आली. सदर कार्यक्रमामध्ये इयत्ता 5 वी ते 10 वी चे विद्यार्थी सहभागी झाले. तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी उपस्थिती दर्शवली. शाळेमध्ये शैक्षणिक वर्षातील माहे जून 2025 कौशल्य शिक्षण आधारित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

प्रारंभी साखरवाडी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. उर्मिला जगदाळे यांनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले व या शैक्षणिक शिक्षणाची सर्वांना उत्सुकता आहे असे सांगितले. यावेळी साखरवाडी शिक्षण संस्थेचे संचालक राजेंद्र शेवाळे, पर्यवेक्षक तुळशीदास बागडे व सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंंचालन नितीन शिंदे यांनी केले तर आभार विलास जाधव यांनी मानले.

Spread the love