पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन, बोळ व गटारांची होणार दुरुस्ती
। लोकजागर । फलटण । दि. २२ मार्च २०२५ ।
पिण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती, बोळांची दुरुस्ती, अंतर्गत गटारांचे काँक्रीटीकरण यासाठी फलटण शहरातील वॉर्ड क्रमांक १ ते १२ म्हणजेच प्रत्येक वॉर्डमधील प्रत्येकी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
फलटण शहरात मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने वॉर्ड क्रमांक १ ते ८ मध्ये आम्ही चालत दौरा केला होता. त्यावेळी पिण्याच्या पाईप लाईन गटारामाधून गेल्याचे तसेच अंतर्गत बोळांचे काँक्रीटीकरण होण्याची आवश्यकता असल्याचे लक्षात आले होते. त्यानुसार या कामांसाठी हा निधी उपलब्ध करुन आणला असल्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
शहरात नाट्यगृहासाठी ८ कोटी मंजूर
फलटण शहरात असलेल्या नाट्यगृहाची अवस्था खराब आहे. नगराध्यक्ष असताना दिलीपसिंह भोसले यांनी पुढाकार घेऊन ते बांधले होतं. त्यानंतर ३० वर्षात फलटणमध्ये अशी कुठलीही इमारत बांधण्यात आली नाही. त्यापार्श्वभूमीवर फलटण शहरामध्ये नवीन नाट्यगृहासाठी ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचेही यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
शहरातील रस्त्यांचा होणार कायापालट
गिरवी नाका ते अहिल्यादेवी चौक या रस्त्यासाठी व सुशोभीकरणासाठी १ कोटी रुपये, शासकीय विश्रामगृह ते गिरवी रस्त्याला ८५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. विडणी बायपास पूल ते जिंती नाका ८४ कोटीचा निधी उपलब्ध होवून त्याची निविदा प्रसिद्ध झाली आहे. जिंती नाका ते कोळकी या रस्त्याचे चौपदरीकरण होणार आहे, अशीही माहिती यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देवून याकामी केलेल्या पाठपुराव्याबद्दल फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांचे अभिनंदन करुन राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व ना. अजितदादा पवार यांना यासर्व कामांसाठी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद दिले.