लोणंदच्या शरदचंद्र पवार विद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
| लोकजागर | फलटण | दि. २६ मार्च २०२५ |
“आपण संशोधन करुन एखादे उत्पादन बनवले, एखादी डिझाईन बनवली किंवा एखाद्या प्रक्रियेचा शोध लावला तर त्याचे हक्क रजिस्टर करून घेणे आवश्यक आहे. त्याचे हक्क रजिस्टर करून घेतल्याशिवाय म्हणजे पेटंट झाल्याशिवाय ते समाजात आणू नये, कारण दुसरे कोणी त्यावर कायदेशीर हक्क दाखवण्याचा धोका असतो”, असे प्रतिपादन यश कल्याणी सामाजिक संस्था पुणेचे अध्यक्ष डॉ. गणेश करे पाटील यांनी केले.

लोणंद येथील रयत शिक्षण संस्थेचे शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद येथे सोमवार दि. २४ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता ‘स्ट्रॅटेजीस फॉर इन्क्रिजिंग इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी फाइलिंग अँड स्टार्टअप्स टू प्रमोट इनोव्हेशन अँड आंत्रेप्रेनर्शिप’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र महाविद्यालयातील आय. क्यू. ए. सी., रिसर्च डेव्हलपमेंट सेल आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर ( मेंटॉर कॉलेज) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या राष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे होते.
“हळद आपलीच आहे तरीपण आपल्याला हळदीच्या पेटंटसाठी लढावे लागले. कारण त्यांचे पेटंट अमेरिका घेत होती. इतिहासाचे जतन करणे ही गरजेची गोष्ट झाली आहे. तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी दिलेले विचार ज्ञान एकत्रितपणे कर्मवीर अण्णांनी आचरणात आणले. निसर्गाशी नातं सांगणारे वडाचे झाड रयत शिक्षण संस्थेचे ट्रेडमार्क म्हणजे प्रतीक आहे. सोने, चांदी, पैसा यापेक्षा भविष्यात इंटेलेक्च्युएल प्रॉपर्टी ही खूप महत्त्वाची आहे. उजबेगिस्तान मध्ये प्राथमिक शाळेत लहान मुलांना आयपीआर इंटेलेक्च्युएल प्रॉपर्टी चा विषय शिकवला जातो”, असेही डॉ. गणेश करे – पाटील यांनी सांगितले.
बीजभाषक इंव्हेशन, इनोवेशन आणि इनक्युबेशन केंद्र वाय. सी. आय. एस. कॉलेज साताराचे सी. इ. ओ. श्री. श्रीकांत कुंदन बोलताना म्हणाले, ” इनक्युबेशन सेंटर नवीन उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी काम करत आहे. देशांमध्ये पाचशे पेक्षा जास्त सेंटर आहेत. स्टार्टअप च्या माध्यमातून नवीन उद्योजक घडवणे यासाठी ते काम करतात. पदवीनंतर लगेच नोकरी मिळत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्टार्टअप सुरू करावा ही भूमिका आहे. एखाद्या समस्येवर उपाय शोधून तो देणे म्हणजे आंत्रेप्रेनर्शिप होय. व्यवसायासाठी पैशापेक्षा आयडिया महत्त्वाची आहे व्यवसायात स्वतःला अपडेट करता आले पाहिजे.”
प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे म्हणाले, “संशोधकांनी आपल्या संशोधनाचे पेटंट घेणे आवश्यक आहे. पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, स्टार्टअप यामधून आपले हक्क आपल्याकडे ठेवता येतात. अमेरिकेत प्रॉडक्ट पेटंटला महत्त्व आहे, तर भारतामध्ये प्रोसेस पेटंटला महत्त्व आहे. यामुळे जगातील औषधापैकी पन्नास टक्के औषध भारतात निर्माण होतात. जगाला औषध देणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. भारतात माणसाच्या हिताला महत्त्व आहे.”
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे आय. क्यू. ए. सी. समन्वयक प्रो. डॉ. सागर डेलेकर कॉपीराईट आणि पेटंट या विषयावर बोलताना म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये कॉपीराईट आणि पेटंट या गोष्टी रुजवल्या पाहिजेत. गरज ही शोधाची जननी असते. लोकांच्यामध्ये अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी स्टार्टअप हा योग्य पर्याय आहे.”
डी. पी. भोसले महाविद्यालय कोरेगावचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलचे डायरेक्टर डॉ. विनायक जमदाडे यांनी कॉपीराईट या विषयावरती विचार मांडले.
वाय. सी. आय. एस. कॉलेज सातारचे आय. पी. आर. ऑफिसर श्री. शुभम डी. जीतुरी यांनी कॉपीराईट आणि पेटंट याची फायलिंग कशी करावी याची माहिती दिली.
यावेळी व्यासपीठावरती मान्यवरांच्या समवेत या चर्चासत्राचे संयोजक डॉ. ए. ए. जगताप, सचिव श्री. बी. एच. काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. सत्राध्यक्ष म्हणून डॉ. बी. एस. बळवंत, डॉ. अमर कांबळे, प्रा. योगेश पाठक यांनी काम पाहिले.
यावेळी डॉ. आनंद शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. या चर्चासत्रामध्ये ६५ प्राध्यापक, संशोधक यांनी सहभाग नोंदविला. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर सेवक यांनी चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
समन्वयक श्री. एस. एच. कुऱ्हाडे, खजिनदार डॉ. एस. बी. शिंदे यांनी काम पाहिले. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन प्रा. सौ. छाया सकटे, प्रा. दिक्षा गायकवाड यांनी केले व मान्यवरांचे आभार आय. क्यू. ए. सी. चे समन्वयक डॉ. सागर शेंडे, डॉ. बाबासाहेब सायमोते, प्रा. सुनील बागवडे, प्रा . पायल घोरपडे यांनी मानले.