प्रशासनाकडून श्रीराम कारखान्याच्या चाव्या पुन्हा संचालकांकडे सुपुर्द

सत्याचा आणि संयमाचा विजय : डॉ. बाळासाहेब शेंडे

। लोकजागर । फलटण । दि. ३१ मार्च २०२५ ।

उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयाला लावण्यात आलेले सिल प्रशासक तथा प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांनी काढून कारखाना कार्यालयाच्या चाव्या काल दिनांक ३० रोजी पुन्हा विद्यमान संचालकांकडे सुपुर्द केल्या. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ‘‘हा सत्याचा आणि संयमाचा विजय आहे’’, अशी प्रतिक्रिया कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी दिली. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन भोसले यांच्यासह संचालक उपस्थित होते.

श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीवरुन गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. विरोधकांनी कारखान्याच्या कारभाराविरोधात उच्च न्यायालयात धाव घेवून प्रशासकीय पातळीवरुन कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळवली आहे. त्यातच भर म्हणून विरोधकांच्या मागणीनुसार शासनाकडून कारखान्यावर प्रशासक नियुक्त करुन कारखान्याचे दफ्तर ताब्यात घेण्यात आले होते. शासनाच्या या प्रशासक नियुक्तीविरोधात विद्यमान संचालक मंडळानेही उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर दि. २७ रोजी सुनावणी अंती न्यायालयाने प्रशासक हटवून पुन्हा विद्यमान संचालकांकडे कारभार देण्याचा निर्णय दिला होता. त्यानुसार प्रशासक तथा प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांनी कारखान्याचा कार्यभार पुन्हा संचालक मंडळाकडे सुपूर्द केला.

कार्यभार स्विकृतीची कार्यवाही पूर्ण झाल्यनंतर बोलताना डॉ. बाळासाहेब शेंडे म्हणाले की, ‘‘श्रीमंत मालोजीराजेंनी राजघराण्यातील चांदी विकून आणि शेअर्स गोळा करुन श्रीराम साखर कारखाना सुरु केला. सन २००२ सालापासून रामराजेंच्या मार्गदर्शनात कारखाना आम्ही चालवत आहोत. श्रीमंत रामराजे यांनी हा कारखाना उर्जितावस्थेत आणला. गेल्या २३ वर्षात आम्ही एक रुपयाचाही भ्रष्टाचार केलेला नाही. कारखान्याच्या आज मितीस सातारा जिल्हा बँकेत ६१ लाखाच्या ठेवी आहेत. कारखान्याच्या खात्यावर २ कोटी २० लाख रुपये शिल्लक आहेत. हा कारखाना कुठेही कर्जात नाही. कारखाना सुस्थितीत असून भविष्यातही तो असाच सुरु राहणार आहे. कारखाना सहकारी तत्त्वावरच सुरु राहणार असून कामगार आणि सभासदांच्या सहभागातून हा कारखाना यशस्वीपणे चालणार आहे. सभासदांनी खरं – खोटं समजून घ्यावं. हा सत्याचा आणि संयमाचा विजय आहे. भविष्यातही हा विजय होणार आहे. त्यामुळे सभासदांनी खर्‍याला साथ द्यावी’’ असे आवाहन करुन ‘‘सर्व सभासद आमच्या पाठीशी राहतील’’, असा विश्‍वासही डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

‘‘दि. २७ रोजी कारखान्यावर प्रशासक नियुक्ती बाबतची सुनावणी झाली. कारखान्याच्या निवडणूकी संदर्भात येत्या 4 तारखेला उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.’’, अशी माहितीही यावेळी डॉ. शेंडे यांनी दिली.

Spread the love