। लोकजागर । फलटण । दि. ०५ एप्रिल २०२५ ।
आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातून फलटण शहरात आलेल्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा लाभ मान्यवरांसह हजारो भाविकांनी घेतला.

श्री श्री रविशंकर महाराज यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग व्यक्ती विकास केंद्र, भडकमकरनगर, फलटण याठिकाणी काल शुक्रवार 04 एप्रिल रोजी मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटणच्या प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व हजारो भाविकांनी या दर्शन सोहळ्याचा लाभ घेतला.

‘‘सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरु असून त्यानंतर ही यात्रा संपूर्ण भारतभर होणार आहे. सर्व भाविक सोमनाथांचे दर्शन घ्यायला जावू शकत नाहीत त्यामुळे त्यांना दर्शनाचा लाभ देण्याचा या यात्रेचा उद्देश आहे. आस्था आणि संस्कृती टिकवून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. संपूर्ण वर्षभर ही यात्रा सुरु राहणार असून त्यानंतर या ज्योतिर्लिंगाची प्राणप्रतिष्ठा सोमनाथ मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे’’, असे या दर्शन यात्रेसोबत असलेले आर्ट ऑफ लिव्हींग फाऊंडेशनचे आंतरराष्ट्रीय संचालक स्वामी दर्शक हाथी यांनी सांगितले.
यावेळी माध्यमांशी बोलताना, ऐतिहासिक शिवलिंगांचे दर्शन घेण्याचा लाभ फलटणकरांना उपलब्ध करुन दिल्याबद्दल आर्ट ऑफ लिव्हींग या संस्थेला प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांनी धन्यवाद दिले.
आर्ट ऑफ लिव्हिंग पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दादासाहेब कदम, प्रविराज नाळे, फलटण शाखेचे डॉ. माधव पोळ, डॉ. विक्रम निकम, डॉ. संध्या निकम, डॉ. निलिमा दाते, उत्तम चोरमले, सौ. सुनीता चोरमले, ज्ञानेश्वर घाडगे, किशोर खेडकर, सौ.सविता लावंड, सौ. अनुराधा गोडसे, सौ. जयश्री पाटील, दिपक कदम, अमोल येवले आदी सेवेकर्यांनी हा दर्शन सोहळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
