महावीर जयंतीच्या शुभेच्छा

| लोकजागर | मुंबई | दि. १० एप्रिल २०२५ |

महावीर जयंतीनिमित्त विविध मान्यवरांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपतींच्या शुभेच्छा

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात म्हटले आहे की: –

“महावीर जयंतीच्या शुभ प्रसंगी मी सर्व देशवासीयांना, विशेषतः जैन बंधू आणि भगिनींना माझ्या शुभेच्छा देत आहे.

अहिंसा आणि करुणेचे मूर्त स्वरूप असलेल्या भगवान महावीर यांनी ‘अहिंसा परमो धर्म: ‘ म्हणजेच अहिंसा हाच सर्वोच्च धर्म आहे, या संदेशाद्वारे मानवतेला एक नवीन मार्ग दाखवला. महावीर जयंती आपल्याला अध्यात्माच्या मार्गावर चालण्याचा तसेच साधेपणा, दया आणि भौतिक संपत्ती व इच्छांपासून अलिप्तता या मूल्यांचा अवलंब करण्याचा संदेश देते.

आपण भगवान महावीरांची शिकवण आपल्या जीवनात आत्मसात करूया आणि समाजात शांती, अहिंसा आणि सौहार्द वाढवूया”.

उपराष्ट्रपतींकडून देशवासियांना शुभेच्छा

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी महावीर जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छा संदेशाचा मजकूर खालीलप्रमाणे:

“महावीर जयंतीच्या शुभ प्रसंगी, मी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो.

भगवान महावीरांची शाश्वत शिकवण – अहिंसा (अहिंसा), सत्य (सत्य) आणि अपरिग्रह (अनासक्ती) – अधिक करुणामय आणि सुसंवादी जगाकडे जाण्याचा आपला मार्ग उजळवत राहतील. सर्व प्राण्यांच्या समानतेचा आणि विविध दृष्टिकोनांचा आदर करण्याचा त्यांचा गहन संदेश आजच्या जगात नेहमीच सुसंगत आहे.

या महावीर जयंतीनिमित्त, आपण त्यांच्या जीवनातून आणि आदर्शांमधून आध्यात्मिक शिस्त, आत्मसंयम आणि वैश्विक करुणा स्वीकारून बलशाली होऊया. त्यांचे शाश्वत ज्ञान आपल्याला आपल्या समुदायांमध्ये आणि त्यापलीकडे सहिष्णुता, समजूतदारपणा आणि शांती जोपासण्यासाठी प्रेरित करो.”

राज्यपालांच्या शुभेच्छा

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्यातील जनतेला महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

महावीर जयंतीचा दिवस तीर्थंकर भगवान महावीरांचे जीवन कार्य तसेच त्यांच्या अहिंसा, त्याग, क्षमा, जीवदया व अनेकांतवादाच्या शिकवणीचे स्मरण करून देतो. महावीर जयंती निमित्त मी राज्यातील सर्व लोकांना, विशेषतः जैन बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महावीर जयंतीच्या शुभेच्छा

“अहिंसा हाच सर्वात मोठा धर्म आहे. तुम्ही जगा, दुसऱ्यांना जगू द्या. लोभ, क्रोध, अभिमान, आसक्ती हेच मोठे शत्रू आहेत, त्यांना स्वत:पासून दूर ठेवा. स्वत:वर मिळवलेला विजय सर्वश्रेष्ठ विजय असतो. प्रत्येक आत्म्यात आनंद असतोच, स्वत: आनंदी रहा आणि दुसऱ्यांना आनंदी ठेवा…,” भगवान महावीरांच्या या विचारांमध्ये सर्वांना सुखी करण्याची ताकद असून मानवकल्याणाचे हे विचार आचरणात आणण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करुया, असे आवाहन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना भगवान महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीरांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन त्यांना श्रद्धापूर्वक वंदन केले आहे. महावीर जयंतीनिमित्त दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे आणि शेवटचे तीर्थंकर होते. चिंतनशील विचारवंत ही त्यांची ओळख होती. त्यांनी मानवतावादाचे विचार मांडले. अखिल प्राणीमात्रांनी सुखी रहावे हे त्यांचे ध्येय होते. राजघराण्यात जन्मलेल्या महावीरांनी ऐहिक सुखाचा त्याग केला. त्याग, संयम, प्रेम, करुणा, शील, सदाचारासारख्या सद्गगुणांचं महत्वं जगाला समजावून सांगितलं. अडीच हजार वर्षांपूर्वी जगाला शांती, अहिंसा, बंधुत्वाची शिकवण दिली. ही शिकवण आजच्या काळात तितकीच किंबहूना अधिक महत्वाची आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगवान महावीर जयंतीनिमित्त दिलेल्या आपल्या संदेशात म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या महावीर जयंतीच्या शुभेच्छा

भगवान महावीरांच्या पवित्र संदेशांचा आपल्या जीवनात अंगीकार करतानाच त्यांनी आपल्याला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. त्यांची शिकवण आजही जीवन शांत, संयमी आणि यशस्वी करण्याचा मार्ग दाखवते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, भगवान महावीरांनी सत्य, अहिंसेबरबरच क्षमा करण्यावर सर्वाधिक भर दिला. त्याग आणि संयम, प्रेम आणि करुणा, नैतिकता आणि सद्गुण ही त्यांची शिकवण होती. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानवजातीला दुःखमुक्तीचा मार्ग दाखविण्यासाठी समर्पित केले.

महावीर जयंती दिनी त्यांच्या शिकवणींचे स्मरण करून त्या आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा दिवस आहे. केवळ शारीरिक हिंसेपासून नव्हे, तर मनाने आणि वाणीनेही कोणालाही दुखवू नये, हा भगवान महावीर यांनी दिलेला संदेश खुप मोलाचा आहे. समाजात शांती, समता आणि बंधुभाव दृढ करण्यासाठी आपण सर्व जण मिळून प्रयत्न करूयात, असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले आहे.

Spread the love